आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: ...तर समृद्धी महामार्गात बदल करण्याबाबत विचार करू -मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. संपूर्ण विचार करूनच याचा डीपीआर तयार करण्यात आलेला आहे. परंतु कोणी जर नवा आराखडा दिला आणि तो जर योग्य असेल तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “दिव्य मराठीशी’ बोलताना स्पष्ट केले. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला शिवसेनेने पहिल्यापासूनच विरोध दर्शवला होता. हा मार्ग होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत शिवसेनेने आंदोलन सुरू केले होते. 

काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गात शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सुपीक जमीन वाचवून नवा मार्ग तयार करता येईल, असे सांगत त्याचे सादरीकरणही केले होते. उद्धव ठाकरे यांनीही पत्रकारांशी बोलताना सुपीक जमीन वगळून समृद्धी महामार्ग तयार करता येऊ शकेल आणि त्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला जाईल, असे सांगितले होते. शिर्डी-औरंगाबाद महामार्ग मोठा करून समृद्धी महामार्ग त्याला जोडावा, असेही ठाकरे यांनी म्हटले होते.  तसेच कर्जमाफीची घोषणा केल्यामुळेही समृद्धी महामार्गाचे काम एक वर्ष लांबणीवर टाकण्याबाबतही विचार सुरू होता.   

उद्धव ठाकरे यांच्या नव्या प्रस्तावाच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची योजना आखत असताना या मार्गातील शेतीची पूर्ण माहिती घेण्यात आली होती. या मार्गाची आखणी करताना कमीत कमी सुपीक जमीन टाळून मार्ग कसा तयार करता येईल ते पाहिले होते. सगळ्या शक्यतांचा विचार करूनच आम्ही डीपीआर तयार केला आहे. भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला कसा मिळेल याचाही विचार आम्ही केला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी जमीन देण्यासाठी पुढे आलेले आहेत. मात्र, जर कोणी समृद्धी महामार्गात बदल करण्याबाबत चांगला आणि योग्य प्रस्ताव दिला तर त्याचा विचार केला जाईल आणि तो जर आम्हाला योग्य वाटला तर त्याच्यावर विचार केला जाईल, परंतु तशी वेळ येईल असे वाटत नाही.  

समृद्धी मार्गाला विरोध कुणाचा हे सर्वांना ठाऊक  
समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले असल्याने ठरलेल्या वेळेत हा मार्ग पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्गाला काही शेतकरी विरोध करत आहेत. त्यातून मार्ग कसा काढणार, असे  विचारता मुख्यमंत्री म्हणाले, समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही. विरोध कोण करत आहे ते सगळ्यांना ठाऊक आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीही समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांच्या आडून काही जण विरोध करत असल्याचे वक्तव्य केले होते. 

अधिवेशनात कर्जमाफीची अंमलबजावणी  
शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अजूनही अंमलबजावणी होत नाही. ती कधी होणार? असे विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, मागील कर्जमाफीवेळी जो घोटाळा झाला होता तसा होऊ नये असा आमचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या अंमलबजावणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. अधिवेशनात कर्जमाफीची अंमलबजावणी होईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...