आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका दाैरा : गुगल, फेसबुकला राज्यात निमंत्रण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दाव्होसमध्ये वाहतूक क्षेत्र इतर कंपन्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आमंत्रण दिल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई अमेरिकेच्या दौर्‍यावर जाणार आहेत. राज्याच्या नव्या आयटी धोरणाची माहिती देऊन गुगल, फेसबुकसह आयटी क्षेत्रातील कंपन्यांची जास्तीत जास्त गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने नव्या आयटी धोरणाला मंजुरी दिली आहे. नव्या धोरणात गेमिंग आणि अॅनिमेशनला प्राधान्य देण्यात आले आहे. या दोन्ही गोष्टींसाठी अॅपलचे संगणक मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. या नव्या धोरणामुळे अॅपलचा राज्यातील व्यवसाय वाढणार असल्याने अॅपलच्या अधिकार्‍यांनी नुकतीच मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्‍यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमेरिका दौर्‍याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, बँकांच्या बँक ऑफिसवर आम्ही या धोरणात भर दिला आहे. सध्या बँक ऑफिससाठी बँका बंगळुरू आणि हैदराबादला प्राधान्य देतात; परंतु भविष्यात बँक ऑफिस आणि डाटा सेंटरचे मुख्य केंद्र महाराष्ट्र व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. डाटा सेंटर्ससाठी अनेक कंपन्या पुढे येणार आहेत. डाटा सेंटर्सचा उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याने राज्यातील कुशल तरुणांना नोकरीच्या अनेक संधी यामुळे उपलब्ध होणार आहेत. तसेच नव्या धोरणात आयटी उद्योगांना मुद्रांक शुल्क, विद्युत शुल्कात सूट, मालमत्ता कर निवासी दराने लावण्याची सुविधांसह व्हॅट आणि एलबीटी, एंट्री टॅक्समध्येही सूट दिली जाणार आहे. एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगर उभारले जाणार असून या सर्व धोरणांची माहिती अमेरिकेतील आयटी कंपन्यांना देण्यासाठी या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. २९ जून रोजी आम्ही अमेरिकेला जाणार असून सहा जुलैपर्यंत हा दाैरा असेल. आहोत. तिथे मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक कंपनीच्या अधिकार्‍यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा केली जाईल. वर्षात ‘आयटी’त महाराष्ट्र अग्रेसर असेल, अशी आशा देसाई यांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसेही अमेरिकेत जाणार
महसूलआणि कृषिमंत्री एकनाथ खडसेही २६ जून रोजी तीन दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर जात आहेत. कृषी आणि अन्य काही बाबींबाबत बैठक असल्याने अमेरिकेला जात असून त्याचा राज्याला चांगला फायदा होईल, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
बातम्या आणखी आहेत...