मुंबई- दिल्लीतील दोन सत्ता केंद्राचा फटका स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बसला असून, राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकेमुळे ते गेल्या तीन वर्षानंतर प्रथमच अडचणीत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री निराशेच्या गर्तेत सापडले असून, त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेसच्या कोट्यातील मंत्रिमंडळातील रिक्त तीन-चार जागा भरण्याचा निर्णय लांबणीवर पडल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
लोकसभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आले होते. गेली तीन-चार दिवस ही कसरत सुरु होती. मात्र शुक्रवारी काँग्रेसशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर चव्हाण यांचा नूरच पालटला. राहुल गांधी यांनी या बैठकीत सर्वच मुख्यमंत्र्यांचा चांगलाच क्लास घेतला तसेच महागाई आणि भ्रष्टाचाराबाबत कोणतेही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींना पत्रकारांनी आदर्शबाबत छेडल्यानंतर त्यांनी दिलेल्या उत्तरांनी तर चव्हाणांचा पूरता चेहरा पडला.
आदर्शच्या रामायणानंतरच चव्हाण यांना दिल्लीतून महाराष्ट्रात धाडले होते. तसेच गेली तीन वर्षे ते कधीही अडचणीत आले नव्हते मात्र आदर्शचा अहवाल फेटाळल्यानंतर तेच अडचणीत आले. आपल्या पक्षातील नेत्यांना वाचविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून आलेल्या निरोपानुसार हा अहवाल फेटाळण्यात आल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली होती. मात्र, सध्या काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेतून जात असून सोनिया गांधी यांच्याकडून राहुल यांच्याकडे हळूहळू पक्षाची सूत्रे चालली आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री चव्हाण दिल्लीतील दोन सत्ताकेंद्राच्या जाळ्यात अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आणखी पुढे वाचा, काँग्रेसच्या गोटातील माहिती व मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर...