आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे मेट्रोला मंजूरी; मुंबई मेट्रो-3 चे येत्या मंगळवारी भूमिपूजन- व्यंकय्या नायडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- राज्यातील नगरविकास विभागाचे विविध प्रकल्प व प्रश्नांसदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे चव्हाण आणि नायडू यांच्यात बैठक झाली.)
मुंबई- पुणे मेट्रोला तत्वत: मंजूरी दिली असल्याचे केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. याचबरोबर मुंबई मेट्रो- 3चे भूमिपूजन येत्या 26 ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती दिली. ठाणे शहरातही मेट्रो सुरु करण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू आज मुंबई दौ-यावर आहेत. आज सकाळी राज्यातील नगरविकास विभागाचे विविध प्रकल्प व प्रश्नांसदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नायडू यांच्यात बैठक झाली. त्यानंतर नायडू यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
नायडू म्हणाले, पुणे मेट्रोला केंद्राने मंजूरी दिली आहे. पुणे मेट्रोबाबत मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले ते दुर्देवी होते. आम्ही यात कोणताही दुजाभाव केला नाही. केंद्राने राज्य सरकारला पुणे मेट्रोबाबत विविध पत्रे पाठविली. मात्र, त्यावर उत्तर दिले नाही. मात्र, हा विषय आता संपला आहे. आम्ही यात कोणतेही राजकारण करू इच्छित नाही. याबाबत वादही नको आहे कारण दोन्ही शहरात भाजपचेच खासदार आहेत.
मुंबईतील कुलाबा ते सीप्झ या मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या भुमिपूजन समारंभ 26 ऑगस्ट रोजी होत आहे. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले आहे त्यांनी उपस्थित रहावे असा चिमटा नायडूंनी मुख्यमंत्र्यांचा काढला. तसेच हा प्रकल्प डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण केला जाईल. ठाणे शहरातही मेट्रो सुरु करण्याचे विचाराधीन आहे. देशातील प्रत्येक शहरात व मोठी नागरीवस्ती असलेल्या भागात मेट्रो असावी या मतांचे आम्ही आहोत, असेही नायडूंनी सांगितले. मुंबई मेट्रोच्या दरावरून राज्य सरकार आणि रिलायन्स यांच्या सुरू असलेल्या वादाबाबत नायडूंना छेडले असता ते म्हणाले, याबाबत कोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकार व रिलायन्स यांची संयुक्त दर निश्चिती समिती याबाबत निर्णय घेईल व ती समिती ठरवेल तोच दर लागू होईल.
देशातील शहरे सुंदर बनविण्याबाबत आमचे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगून नायडू म्हणाले, 2022 पर्यंत सर्वांना घर मिळेल यावर आम्ही काम करीत आहोत. शहरांसाठी सध्या लागू असलेली 'जेएनएनयूआरएम' या योजनेची मुदत संपल्यानंतर आम्ही नवीन वेगवेगळ्या योजना आणणार आहोत. याचबरोबर संसदेचे कामकाजात सुधारणा करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे. शेजराच्या देशासोबत संबंध सुधारणे यावर आमचा भर आहे.
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध उद्घाटन समारंभावर बहिष्कार घातल्याबाबत विचारले असता नायडू म्हणाले, काँग्रेस अद्याप लोकसभेतील पराभावातून बाहेर आलेली नाही. लोकसभेतील पराभवातून काँग्रेस काहीही शिकलेली दिसत नाही. 16 राज्यात एकही खासदार निवडून न आल्याने काँग्रेस भयभीत झाली आहे. या नैराश्यातूनच त्यांनी असले राजकारण सुरु केल्याचे नायडूंनी टीका केली.
पुढे आणखी वाचा...