मुंबई- दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला काल झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 लाख रुपये तसेच गंभीर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली. त्याचबरोबर अपघातातील इतर सर्व जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेनंतर पुढील काळात अशा घटना घडू नयेत या संदर्भात पाऊले उचलणे अतिशय आवश्यक आहे असे सांगितले. दरम्यान, या अपघातातील मृतांचा आकडा 22 वर पोहचला आहे.
आज दुपारी मुख्यमंत्र्यांनी रोहा येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली व त्यांची विचारपूस केली. त्यानंतर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या रेवोली येथे जाऊन ज्यांनी पाहणी केली. रायगडचे पालकमंत्री सुनिल तटकरे, कोकणचे विभागीय आयुक्त आर. एल. मोपलवार तसेच उपस्थित वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली.
मुख्यमंत्र्यांची रेल्वे मंत्र्यांशी चर्चा- दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला नागोठण्याजवळील भिसे खिंडी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी रविवारीच चर्चा केली. या अपघाता बद्धल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले असून जखमीना तातडीने उपचार देण्यात यावेत अशा सुचना स्थानिक प्रशासनालाही दिल्या. त्यांनी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांशी बोलून आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकार करेल असे सांगितले. हा अपघात दुर्गम ठिकाणी घडला असला तरी मदतकार्य वेगाने सुरु असून मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना रेल्वेतर्फे तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारही यासंदर्भात सर्वोतोपरी मदत करीत आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढे क्लिक करा...