आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांच्या नातेवाइकाने उकळला पार्टी फंड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईतील औद्योगिक आणि बिगरशेती भूखंडांची आरक्षणे बदलून पक्षासाठी 115 कोटींचा पार्टी फंड मिळवण्यात हातभार लावल्याचा गौप्यस्फोट भाजपचे आमदार अँड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच तोफ डागली.

मुख्यमंत्र्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. मात्र मागील वर्षभरात त्यांच्याकडील नगरविकास खात्यामध्ये भूखंडांचे झोन बदलण्यामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शेलार यांनी केला. पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईमधील 33 भूखंडांचे आरक्षण मुख्यमंत्र्यांनी यांनी बदलले. त्यामुळे औद्योगिक आणि बिगरशेतीची 664 एकर इतकी जागा निवासी झोनमध्ये परावर्तित झाल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे.

नगरविकास खात्याकडील भूखंडांचे आरक्षण बदलण्याच्या कामी रोहन जगदाळे मध्यस्थ असून तो मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असल्याचा आरोप शेलार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी या 33 भूखंडांचे आरक्षण बदलल्यामुळे विकासकांना 2 कोटी 98 लाख चौ. फू. निवासी जमीन उपलब्ध झाली. त्या मोबदल्यात काँग्रेसला 115 कोटींचा पक्षनिधी मिळाला, तो कॉँग्रेसने गुजरात निवडणुकीसाठी वापरल्याचा आरोपही शेलार यांनी केला. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये मुंबईचा उल्लेख नसल्याबद्दल खेद व्यक्त करून मुंबईच्या पायाभूत विकासाकडे आघाडी शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.