आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM To Inaugurate Eastern Freeway Phase 1 Tomorrow

ईस्टर्न फ्री वे उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला होणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईतील उपनगरांशी जोडणारा, देशातला दुसरा सर्वात मोठा उन्नत मार्ग अशी ख्याती असलेला पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे) वाहतुकीस उद्या खुला होत आहे. या मार्गाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्या दुपारी 3 वाजता होत आहे.

मुंबईचा चेहरा मोहरा बदलून टाकणारी कामे सध्या वेगाने पूर्ण होत असून, हा 1200 कोटी रुपयांचा पूर्व मुक्त मार्गाचा प्रकल्प यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जातो. यादृष्टीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याची उभारणी वेगाने होण्यासाठी सातत्याने केंद्राकडे देखील पाठपुरावा केला होता.

या मार्गाची ओळख करुन देणारी ही काही वैशिष्ट्ये वाचा खालीलप्रमाणे-

- पी डिमेलो रोडवरील ऑरेंज गेट ते आणिक पांजरपोळ या 13.59 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गावर कुठेही सिग्नल नाहीत. पांजरपोळ ते घाटकोपर या 3 किलोमीटरच्या दुस-या टप्प्याचे काम देखील पुढील महिन्यापासून सुरु होणार. अशारितीने एकंदर 17 किलोमीटरचा हा उन्नत मार्ग म्हणजे देशातील अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना असणार आहे.

- दररोज सुमारे 25 हजारांपेक्षा जास्त वाहने धावतील अशी अपेक्षा असून, ऑरेंज गेट ते पांजरपोळ पर्यंतचा प्रवास हा केवळ 25 मिनिटात पूर्ण होईल.

- या पुलाला 313 खांब आहेत. 9.29 किलोमीटरचा रस्ता उन्नत (एलिव्हेटेड) असून 4.3 किलोमीटरचा 550 मीटर रुंदीचा दुहेरी बोगदा असेल, अशा प्रकारचा बोगदा देशाच्या कुठल्याही शहरी भागात नाही.

- या मार्गामुळे मुंबईच्या पूर्व भागातील डॉ. आंबेडकर रोड, पी डिमेलो रोड आणि पोर्ट रोड भागातील वाहतूक गर्दीची समस्या सुटेल.

- नऊ ठिकाणी या मार्गावर येण्यासाठी-जाण्यासाठी मार्ग असतील. सध्याच्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड आणि सायन-धारावी रस्त्यावरुन जाणारे वाहन धारक देखील हा रस्ता वापरल्याने या संपूर्ण भागात वाहतूक सुरळीत होईल.

- कुलाबा, नरिमन पाँईन्ट, मलबार हिल, मुंबई सेंट्रल, फोर्ट, क्रॉफर्ड मार्कट, मस्जिद, ताडदेव, काळबादेवी, गिरगाव, या भागातून येणा-या वाहनांना ईस्टर्न फ्री वेवर ऑरेंज गेटपासून येता येईल. किंग्ज सर्कल, माटुंगा, दादर, सायन, वडाळा, फाइव्ह गार्डन, प्रभादेवी, वरळी यांना शिवडी – वडाळा- चेंबूर येथून या फ्री वेवर येता येईल. शिवडी नर्सिंग होम भागातून पी डिमेलो रोड आणि चार रस्ताकडे येणा-या तसेच विरुध्द दिशेच्या सर्व वाहनांना याच मार्गावरुन फ्री वेवर जाता येईल.

- यावर्षी सांताक्रूझ- चेंबूर जोड रस्त्याचे काम देखील पूर्ण होईल. रेल्वेकडून आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असल्याने हे काम देखील युध्द पातळीवर सुरु आहे. हा रस्ता खुला झाला की एकूणच या संपूर्ण भागातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर दूर होवून वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे.