आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची आज उद्योजकांशी थेट चर्चा, मूल्य साखळी विकासाशी संबंधित माहिती देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सार्वजनिक व खासगी भागीदारीतून एकात्मिक कृषी विकास या महत्त्वाकांक्षी उपक्रमास अधिक चालना देण्यासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी, व्यापार व उद्योग क्षेत्रातील बड्या उद्योगांचे प्रमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिका-यांशी थेट चर्चा करणार आहेत.
चर्चेत मूल्य साखळी विकासासाठी सद्य:स्थितीत शासनाने हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती उद्योग प्रतिनिधींना मुख्यमंत्री देतील. शिवाय उपक्रमाची व्याप्ती ५० लाख शेतक-यांपर्यंत वाढविण्याच्या दृष्टिकोनातून खासगी उद्योजकांच्या कल्पना व सूचनांवर सखोल चर्चाही केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

५ वर्षांत व्याप्ती वाढवणार
राज्यातील बहुतांश शेती कोरडवाहू असून राज्यातील शेतक-यांना शेतीद्वारे शाश्वत उत्पन्नाचे साधन विकसित करण्याचा विचार राज्य सरकार करत असून त्यासाठी खासगी उद्योजकांच्या मदतीने राज्यात मूल्य-साखळ्यांची शंृखला विकसित करण्यावर मुख्यमंत्री भर देणार आहेत. उपक्रमाच्या माध्यमातून २०१२-१३ मध्ये २० खासगी कंपन्या आणि सुमारे एक लाख शेतक-यांच्या सहभागाने १० मूल्य-साखळ्या विकसित करण्यात आल्या होत्या. २०१४-१५ मध्ये ६० उद्योजक कंपन्या व ५ लाख शेतक-यांच्या सहभागाने ३० मूल्य साखळ्या विकसित केल्या होत्या. आगामी पाच वर्षांत ५० लाख शेतक-यांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
२८ कंपन्या सहभागी
या बैठकीस कृषी राज्यमंत्री राम शिंदे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे लिझा ड्रेअर, कृषी व्यापार व उद्योग जगतातील एडीएम, रॅलीज इंडिया, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्थान युनिलिव्हर, अदानी –विल्मर समूह, कारगिल इंडिया लि., फ्युचर ग्रुप, यूपीएल-ॲडव्हांटा, सिंजेंटा, मोन्सँटो, जैन इरिगेशन लि., रुची सोया इंडस्ट्रीज लि. आदी २८ कंपन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.