आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन निवडणुका लवकरच, राजेश टोपे यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई । महाविद्यालयीन स्तरावरील निवडणुका पुन्हा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव 15 दिवसांत मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

वारंवार मागणी करूनही महाविद्यालयीन निवडणुकांवर घातलेली बंदी सरकारकडून उठवण्यात येत नसल्याची बाब आमदार जितेंद्र आव्हाड, विलास लांडे, बापूसाहेब पठारे व लक्ष्मण जगताप यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केली होती. त्या वेळी राज्यात विद्यार्थी परिषदांच्या निवडणुकांवर घातलेली बंदी उठवण्यासाठी तत्कालीन आयुक्त लिंगडोह यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमातील विद्यार्थी परिषदेबाबतच्या कलम 40मध्ये आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने विद्यापीठ अधिनियमात काही बदल सुचवत नवीन उपकलमे अंतर्भूत करण्याची शिफारस केली आहे. या समितीने अहवाल सरकारकडे दिला आहे. त्यानुसार निवडणुका सुरू करण्यासाठी 15 दिवसांत कॅबिनेटसमोर प्रस्ताव ठेवण्यात येईल, अशी माहिती टोपे यांनी दिली.

इतिहास काळाकुट्ट : प्रताप सरनाईक
वेळूकर समितीनेही अहवाल सादर करूनही यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना आहे. आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्ती विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातूनच पुढे आले आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून विद्यार्थिदशेतच तरुणांना संसदीय कार्यप्रणालीची ओळख होते. त्यामुळे त्या लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी आव्हाड यांनी या वेळी केली. त्यांच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करताना प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थी चळवळीचा इतिहास काळाकुट्ट असल्याचे सांगितले. या चळवळीत गुन्हेगारीशी संबंधित व्यक्तींचा वावरदेखील वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनीदेखील हीच भीती व्यक्त केली.