आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कॉमेडी नाइट्स’ची ट्रॅजेडी; भीषण आगीत सेट खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशवासीयांना पोट धरून हसवणा-या कलर्स वाहिनीवरील ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ (कपिल शर्मा) या विनोदवीराच्या शोचा गोरेगाव फिल्मसिटी येथील सेट बुधवारी सकाळी आठच्या सुमारास जळून खाक झाला. या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या चार बंबांनी ही आग आटोक्यात आणली. आग ज्या वेळी लागली त्या वेळी येथे चित्रीकरण सुरू नव्हते. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अद्याप माहिती नाही. यात नेमके किती नुकसान झाले हे आताच सांगता येणार नाही.


लवकरात लवकर पुन्हा या शोच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येईल. आमच्या प्रेक्षकांचा हिरमोड होऊ देणार नाही, असे कलर्स वाहिनीतर्फे सांगण्यात आले.


आता शो एकच दिवस
प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी नुकताच आपल्या ‘24’ या मालिकेच्या प्रमोशनसाठी ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ शोमध्ये सहभाग नोंदवला होता. त्या वेळी त्यांनी या शोचे भरभरून कौतुक केले होते. ही मालिका कलर्स वाहिनीवर 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.


चाहत्यांचे आभार
आम्ही सर्व जण सुखरूप आहोत. लाखो चाहत्यांचे मनापासून आभार. यापुढेही असाच आमच्या शोला प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा आहे. आम्ही लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ. - कपिल शर्मा, विनोदवीर


मालिका चार महिन्यांत लोकप्रियतेच्या शिखरावर
कपिल शर्मा याने कॉमेडियन म्हणून ख्याती मिळवल्यानंतर स्वत: ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोची निर्मिती केली. जून महिन्यात सुरू झालेल्या शोला केवळ चार महिन्यांत देशवासीयांनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. प्राइम टाइममध्ये सर्वाधिक पाहण्यात येणारा हा शो असून त्याने अनेक विक्रम मोडले आहेत. तसेच या शोचे आजवर केवळ 26 भाग प्रसारित करण्यात आले आहेत. यात कपिल शर्मा (बिट्टू), अली असगर (दादी), सुमोना चक्रवर्ती (मिसेस शर्मा), उपासना सिंह (बुआ), सुनील ग्रोव्हर (गुथ्थी व वेगवेगळी पात्रे), किकू शारदा यांच्या भूमिका विशेष गाजत आहेत. तसेच कायमचे पाहुणे म्हणून नवज्योतसिंग सिद्धू यांनीही आपल्या शेरोशायरीने या शोला चार चांद लावले आहेत.