आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Come Back, Come Back Balasaheb, One Saheb Balasaheb

‘परत या, परत या, बाळासाहेब परत या’,एकच साहेब बाळासाहेब....\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना गतवर्षी अखेरचा निरोप देताना राज्यभरातील लाखो शिवसैनिक व ठाकरेप्रेमींनी त्यांना परत येण्याची आर्त हाक दिली होती. आज तब्बल एक वर्षानंतर, त्यांच्या स्मृतिदिनी याच भावनेने शिवसैनिकांनी आपल्या साहेबांना पुन्हा हाक दिली, तेव्हा केवळ शिवाजी पार्कच नव्हे तर संपूर्ण महाराष्‍ट्र भावनावश झाला होता. रविवारी पहिल्या स्मृतिदिनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशातील दिग्गज राजकीय नेते, हजारो शिवसैनिक व सामान्य नागरिकांनी शिवाजी पार्कवर रीघ लावली होती.
‘परत या परत या, बाळासाहेब परत या,’ ‘एकच साहेब बाळासाहेब...’ एक वर्षानंतर पुन्हा अशी आर्त साद हजारो शिवसैनिकांनी रविवारी शिवाजी पार्कवर घातली अन् लाडक्या नेत्याच्या आठवणीने केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्‍ट्र पुन्हा गहिवरून गेला. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी हजारो मैलाचा प्रवास करत आलेल्या राज्यभरातील असंख्य शिवसैनिकांनी समाधी स्थळावर डोके टेकवत अश्रू भरल्या डोळ्यांनी बाळासाहेबांना साष्टांग दंडवत घातला.
मागील वर्षी 17 नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन झाले. रविवारी त्यांचा पहिला स्मृतिदिन होता. यानिमित्त बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारपासूनच शिवसैनिकांचे जत्थेच्या जत्थे शिवाजी पाकवर धडकत होते. रविवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक मान्यवरांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी हजेरी लावली होती. शिवसेना भवन ते शिवाजी पार्क या मार्गावर स्टॉल्सची गर्दी दिसत होती. बाळासाहेबांच्या भाषणांची, व्यंगचित्रांची पुस्तके खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडत होती. शिवसेनाप्रमुखांची छायाचित्रे, शिवसेनेचे बिल्ले, भगवे झेंडे, कॅसेट्स यांची दुकानेही मोठ्या प्रमाणावर लागली होती. राज्याच्या काना-कोप-यातून आलेल्या शिवसैनिकांना स्थानिक कार्यकर्त्यांतर्फे पाणी, नाश्ता पुरवले जात होते. शिवाजी पार्क परिसरात मोबाइल टॉयलेट, पाण्याची टँकर्स जागोजागी ठेवण्यात आले होती.
शिवसेना भवनाजवळ जरीची किनार असलेले भव्य भगवे झेंडे डौलाने फडकत होते. बाळासाहेबांना आदरांजली वाहणारी मोठमोठी शिवसेना, भाजप, रिपाइंच्या नेत्यांनी लावली होती. आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक रांगेत उभे होते. कोणाच्या काखेत मोठमोठ्या बॅगा, कोणाच्या गळ्यात भगवे उपरणे तर कोणाच्या डोक्यावर भगवी टोपी असे, चित्र होते. काही शिवसैनिकांच्या हातात बाळासाहेबांची भव्य छायाचित्रे होती. ‘साहेब असायला हवे होते’ अशीच भावना जो- तो बोलून दाखवत होता.
शिवसैनिकांच्या आर्त हाकेने शिवाजी पार्क पुन्हा गहिवरला....................