मुंबई- सनातन संस्थेशी संबंधित फरार अारोपी सारंग अकोलकर
आपल्या नियमित संपर्कात असल्याचे वक्तव्य करणारे हिंदू विधिज्ञ परिषदेचे अॅड. संजीव पुनाळेकर सीबीआयच्या रडारवर असून त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. तशी परवानगी सीबीआय उच्च न्यायालयात मागेल, अशी शक्यता आहे.
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या वीरेंद्रसिंह तावडेला अटक केल्यानंतर सीबीआयने आपला माेर्चा सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीकडे वळवला आहे. तसेच या दोन्ही संस्थांच्या प्रवक्त्यांमार्फत होणाऱ्या बेछूट आरोपांमुळे तपासात अडथळे निर्माण होत असल्याची बाबही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणली जाणार आहे.
दाभोलकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तावडेची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या हत्येसंदर्भात केले जाणारे एकही वक्तव्य दुर्लक्षित न करण्याचे धोरण सीबीआयने अवलंबले आहे. त्यामुळेच सनातन संस्था तसेच हिंदू जनजागृती समितीच्या प्रवक्त्यांमार्फत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवरही सीबीआय लक्ष ठेवून आहे. मध्यंतरी हिंदू विधिज्ञ परिषदेच्या अॅड. संजीव पुनाळेकर यांनी सारंग अकोलकर आपल्या नियमित संपर्कात असल्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सीबीआय त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. सध्या उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान पुनाळेकर यांच्या चौकशीची परवानगी मागण्याचा सीबीआय विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वकिलांच्या संरक्षणार्थ असलेल्या काही कायदेशीर बाबींचा गैरवापर करून इतक्या संवेदनशील तपासाबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे तपासात अडथळा तर निर्माण होतोच, मात्र असे वक्तव्यसुद्धा तपासाचा एक महत्वाचा धागा ठरू शकते. कारण सध्या तपास अशा टप्प्यावर आला आहे, जिथे कोणतीही बाब दुर्लक्षित करणे योग्य होणार नाही, असेही सीबीआयचा एक अधिकारी म्हणाला.
सर्व्हरचीही न्यायवैद्यक तपासणी
तावडेच्या अटकेनंतर सीबीआयच्या पथकाने सोमवारी सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमातून एक सर्व्हर जप्त केला. त्यातील माहिती मिळवण्यासाठी तो न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. पनवेल येथील आश्रमात दुसऱ्या मजल्यावर आश्रमाची संगणक प्रयोगशाळा असून त्यातील संगणकांमधे तपासाच्या दृष्टीने महत्वाची माहिती मिळू शकते, ही बाब लक्षात घेऊन प्रयोगशाळेतीस सर्व्हर जप्त करण्यात आला आहे.
अटकेतील वीरेंद्र तावडेलाही मदत
अकोलकरने त्याला हव्या असलेल्या कायदेशीर मदतीबाबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधल्याची कबुली अॅड. पुनाळेकर यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली. कोणत्याही हिंदूवर आरोप झाले तेव्हा हिंदू विधिज्ञ परिषदेच्या वतीने कायदेशीर मदत दिली गेल्याचे पुनाळेकर म्हणाले. वीरेंद्र तावडेलाही आम्ही जरूर मदत करू, असेही त्यांनी सांगितले.