आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Condition Of TTE For Teachers Recruitment Cancelled

शिक्षक भरतीसाठी ‘टीईटी’ची अट शिथिल, राज्यमंत्री फौजिया खान यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी राज्य शासनाकडून घेण्यात येणार्‍या ‘टीईटी’ या सामायिक परीक्षेचा आराखडा अद्याप तयार नाही. त्यामुळे इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या शिक्षक भरतीसाठी या परीक्षेची अट तूर्तास शिथिल करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री फौजिया खान यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

भगवान साळुंखे, नागो गाणार, रामनाथ मोते या सदस्यांनी याबाबत मंगळवारी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या निर्णयामुळे राज्यात नव्याने भरती करण्यात येणार्‍या इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांची शिक्षकांची भरती प्रक्रिया वेगाने होईल, अशी आशा खान यांनी व्यक्त केली. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची हजारो पदे रिक्त आहेत. त्याचा गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असा मुद्दा भगवान साळुंखे यांनी मांडला.
‘टीईटी’ परीक्षेचे स्वरूप अद्याप निश्चित नाही. ती घेण्याचे कोणतेही वेळापत्रक ठरलेले नाही. त्यामुळे शिक्षकांची नव्या भरतीसाठी या परीक्षेची अट रद्द करावी, अशी मागणी विक्रम काळे, रामनाथ मोते यांनी केली. राज्यात 3 ते 5 ऑक्टोबर 2011 या कालावधीत पटपडताळणीची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. ज्या शाळांत 20 ते 4९ टक्के अनुपस्थिती आहे. त्या शाळांतील शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करावे. परंतु शिक्षकांची भरती मात्र करु नये, अशी सूचना मुख्य सचिवांच्या समितीने केली होती, परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन इंग्रजी, विज्ञान, गणित विषयांच्या शिक्षक भरतीला 6 मे 2013 रोजी विशेष आदेश जारी करून परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती फौजिया खान यांनी दिली.

शिक्षकांना प्रचाराला लावल्यास कारवाई

राज्यातील शिक्षण संस्थाचालकांनी आपल्या संस्थेतील शिक्षकांना निवडणूक प्रचारांना लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. पुरवण्या मागण्याच्या वेळी ते बोलत होत्या.
बीड येथील आदर्श व नोबल शिक्षण संस्थातील शिक्षकांना निवडणुकांच्या प्रचारासाठी गुंतवले जात असल्याचा मुद्दा आमदार प्रा. सुरेश नवले यांनी उपस्थित केला होता. शिक्षकांचे काही संस्थाचालकांकडून आर्थिक आणि मानसिक शोषण बीड जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे शिक्षकांची प्रतिष्ठा धुळीस मिळवणार्‍या शिक्षण संस्थांवर कारवाई करावी,
अशी मागणी नवले यांनी केली होती.