आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Conflicts Between Nagar & Marathwada District People Over Water Release From Mula & Other Dams

मराठवाड्याला पाणी सोडण्यावरून वाद पेटला, नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा आदी धरणातून टप्प्याटप्प्याने जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात संपूर्ण नगर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. नगरमधून मराठवाड्यात पाणी सोडण्याचा निर्णय मागे घेत नसल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणी सर्वपक्षीय आंदोलन सुरु आहेत.
अकोल्यात माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी पाटबंधारे कार्यालयाला घेराव घातला आहे. संगमनेरमध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थकांनी आंदोलन करीत तेथील पाटबंधारे कार्यालयाला घेराव घातला आहे. राहुरीतही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. तर, नगर-मराठवाडा पाणी प्रश्नी नागपूरात भाजपच्या आमदारांनीच सरकारविरोधात आंदोलन पुकारले आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता काळे आणि बाळासाहेब मुरकुटे यांनी विधानभवनाच्या पायरीवर बसून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. नगरमध्ये सोमवारपासून राज्य महामार्गावर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात पाणी प्रश्न चांगलाच पेटणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
राज्य सरकारने नगर जिल्ह्यातील तीनही धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात नगरकरांच्या तीव्र भावना आहेत. जायकवाडीत सध्या 47 टीएमसी पाणी साठा असतानाही पाणी सोडण्याचा हा घात अन्यायकारक असून 'मुळा'चे पाणी म्हणजे शेतक-यांचे रक्त आहे, तेच काढून घेणार असेल, तर शेतकरी कसा जगणार, असा सवाल करून मुळा धरणाचे गेट उघडू देणार नाही अशी भूमिका माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी घेतली आहे.
भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणी मराठवाड्यासाठी सोडण्याच्या निषेधार्थ राहुरी येथील शिवसैनिकांनी नगर-मनमाड राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला.
सरकारने आमचे म्हणणे ऐकले तर ठीक नाही तर आज सायंकाळपर्यंत आम्ही मुठा धरणाचे गेटबंद आंदोलन करू असा इशारा नगरकरांनी दिला आहे. त्यामुळे सरकारने मुळा धरणावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस निरीक्षकांसह 7 फौजदार व 55 पोलिस कर्मचारी धरणावर बंदोबस्तासाठी आहेत. मुळा धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी पाच ते सहा दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागासह महसूल, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
पाटबंधारे विभागासह महसूल, पोलिस यंत्रणांच्या उपस्थितीत व चोख बंदोबस्तात सोमवारी मुळा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले आहे. 3000 क्युसेक वेगाने मुळा नदीत विसर्ग सुरू असून, पाच-सहा दिवसांत 3.5 टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे. भंडारदरातून 2800 क्युसेकने निळवंडेसाठी प्रवरा नदीत रविवारपासून विसर्ग सुरू आहे.
निळवंडे भरल्यानंतर आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत हे पाणी जायकवाडीकडे झेपावेल. भंडारदरा व निळवंडेतून 4.3 टीएमसी पाणी सोडले जाईल. अशा पद्धतीने मूळा धरणाचे गुरुवारपर्यंत, तर भंडारदराचे पाणी 9 ते 10 दिवसांनी जायकवाडीत पोहोचेल. मात्र, त्यापूर्वीच मराठवाडा व नगरकरांमध्ये पाणी प्रश्नांवर चांगलाच वाद पेटला आहे.