आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंपासून मला व माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका- राजन तेली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सिंधूदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते नारायण राणे आणि त्यांचे जुने कट्टर समर्थक व सध्या भाजपात दाखल झालेले राजन तेली यांच्यात चांगलाच संघर्ष उफाळला आहे. नारायण राणे आणि त्यांचा आमदार मुलगा नितेश राणे यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे अशी भीती माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केली आहे. राजन तेली यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची भीती व्यक्त केली. चार दिवसापूर्वी राजन तेली यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. सुदैवाने तेली त्यावेळी गाडीत नव्हते. तसेच गुरुवारी जिल्हा बँकेचे निकाल लागल्यानंतर राणे समर्थकांनी तेलींच्या घरावर दगडफेक केली आहे. त्या पार्श्वभूमीवर तेली यांनी राणेंवर हे आरोप केले आहेत.
राजन तेली म्हणाले, चार दिवसापूर्वी आपल्या गाडीवर झालेला हल्ला हा राणेंनी आपल्या अंगरक्षकांद्वारे घडवून आणला. आपण त्यांचे राजकीय विरोधक झाल्यापासून ते आपल्यावर पाळत ठेवत आहेत. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. भविष्यात माझे व माझ्या कुटुंबियांचे काही बरे-वाईट झाल्यास या सर्वाला राणे पितापुत्र जबाबदार असतील असा खळबळजनक आरोप तेली यांनी केला.
आपल्याला माहित असेलच की गुरुवारी जिल्हा बॅंकेच्या जाहीर झालेल्या निकालात सिंधूदुर्गमध्ये नारायण राणेंनी वर्चस्व राखले होते. राणेंच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या संकल्प सिद्धी सहकार पॅनेलने 19 पैकी 15 जागा जिंकून जिल्ह्यात आपणच दादा असल्याचे दाखवून दिले होते. तर राजन तेलींच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना-भाजपच्या वैभव पॅनेलला केवळ 4 जागा जिंकता आल्या होत्या.
या पॅनेलचे नेतृत्त्व करणारे व जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद भूषविलेल्या राजन तेलींना पराभवाचा झटका बसला. राणेंचे समर्थक प्रमोद धुरी यांनी तेली यांना पतसंस्था मतदारसंघातून पराभवाची धूळ चारली आहे. यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करीत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयोत्सव साजरा करताना तेलीविरोधात कडव्या घोषणा दिल्या गेल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या तेली समर्थक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे तणावाचे वातावरण झाले. त्यानंतर राणे समर्थकांनी तेलींच्या घरावर दगडफेक केली.