आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समन्वय बैठक झाली अन् नाराजी पळाली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्रात यूपीएमध्ये काँग्रेसकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप करून नाराजी जाहीर करताना महाराष्ट्रातही समन्वय समितीची बैठक झाली नसल्याचा कांगावा राष्ट्रवादी काँग्रेसने केल्यानंतर अखेर शनिवारी काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय समितीच्या बैठकीचा मुहूर्त लागला. राज्यासंबंधी धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकत्र बसून घेतील या मुद्द्यावर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचे एकमत झाले.
दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजनांवरही बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी केंद्राकडे निधी मागण्यावरही दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीला काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश तर राष्ट्रवादीतर्फे अजित पवार, मधुकर पिचड आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी समितीमध्ये पाच सदस्य असावेत, असा आग्रह धरला होता. त्याचीही बैठकीत चर्चा झाली. दोन्ही पक्षश्रेष्ठी समन्वय समितीमध्ये किती सदस्य असतील याचा निर्णय घेतील, असे मोहन प्रकाश यांनी सांगितले.
एक वर्षानंतर एकत्र चर्चा - जवळपास एक वर्षाने दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र बसून दोन तास चर्चा केली असली तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने विदर्भामध्ये भाजपबरोबर केलेली युती, ठाणे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसने शिवसेनेला दिलेला पाठिंबा असे कोणतेही वादग्रस्त मुद्दे या वेळी चर्चेत आले नाहीत. काही महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री परस्पर घेतात, असा आक्षेप राष्ट्रवादीने नोंदवला होता. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे मुख्यमंत्री करत नाहीत, विकास कामे रखडली आहेत, असे मुद्दे राष्ट्रवादीतर्फे उपस्थित करण्यात आले. बैठकीनंतर नाराजी दूर झाली असल्याचे पिचड म्हणाले. वादग्रस्त विषय समन्वय समितीमध्ये बसून सोडवण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माणिकराव ठाकरे यांनी दुष्काळावर चर्चा झाल्याचे सांगून या महिन्यात पंतप्रधान मनमोहनसिंग राज्याच्या दौ-यावर येतील तेव्हा दुष्काळी स्थितीची त्यांना माहिती दिली जाईल, असे सांगितले.
काय ठरले?
प्रत्येक महिन्यात एकदा समन्वय समितीची बैठक होईल.
दोन्ही पक्षांसमोर वेळोवेळी उपस्थित होणारे प्रश्न सोडवले जातील.