मुंबई- सध्या टीव्हीवर काँग्रेसची एक जाहिरात येत आहे. त्यात अभिनेता अनिकेत विश्वासराव
आपली बाईक दुरुस्त करण्यासाठी ‘शिव’ नावाच्या मेकॅनिकला शोधत असतो. 'मी माझी गाडी दुसऱ्याच्या हातात का देऊ? माझी नस जो ओळखतो, त्याच्याच हातात मी माझ्या गाडीची चावी देणार' असे सांगत महाराष्ट्राची जाण असणा-या काँग्रेसच्याच हातात महाराष्ट्र द्या अशी काँग्रेस पक्षाची जाहिरात करणारा अभिनेता अनिकेत विश्वासराव मात्र प्रत्यक्षात शिवसेनेचा प्रचार करताना दिसत आहे.
मागील महिन्यात रिलिज झालेल्या 'पोस्टरबॉय' या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी जनतेच्या पुढे आलेल्या अनिकेतने काँग्रेसची जाहीरात केली आहे. मात्र ही जाहीरात केवळ व्यावसायिक गरज म्हणूनच केल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण हाच अनिकेत मुंबईत सध्या शिवसेनेचा प्रचार करताना आढळला आहे. एवढेच नव्हे तर त्याने शिवसेनेचा स्टिकर असलेला मफलर गळ्यात घालून पोझ दिली.
मुंबईतील विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचारासाठी अनिकेत विश्वासराव आल्याचे दिसून आले. त्याच्यासोबत अभिनेता संतोष जुवेकर हा सुद्धा उपस्थित होता. एकूणच विधानसभेच्या रणधुमाळीत कलाकारांना चांगलीच मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेतेही एकाची जाहीरात करीत आहेत तर, एकाचा प्रचार करीत आहे. एकून कलाकार दोघांकडून त्यासाठीची मोठी रक्कम वसूल करताना दिसत आहेत.
पुढे छायाचित्रातून पाहा, शिवसेनेच्या प्रचारात सामील झालेला पोस्टरबॉय अनिकेत विश्वासराव...