आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईविरोधात काँग्रेसचे 6 पासून आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘केंद्र सरकारने लादलेल्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ 6 जुलैपासून कॉँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल,’ अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात महागाई कमी करण्याबाबत जनतेला आश्वासने दिली होती. परंतु पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना या आश्वासनांचा विसर पडला. त्यांचे सरकार आल्यानंतर महागाई सतत वाढतच असल्याने मोदींनी प्रचारात दिलेली आश्वासने फसवी असल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पेट्रोल, डिझेल, रेल्वे भाडे, स्वयंपाकाचा गॅस आणि दैनंदिन गरजेच्या सर्वच वस्तूंची भाववाढ झाली आहे. त्याच्या निषेधार्थ कॉँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सावंत म्हणाले.

या आंदोलनात जिल्हा मुख्यालयांसह तालुका स्तरावर निदर्शने केली जातील. प्रामुख्याने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा प्रतीकात्मक निषेध म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते दुचाकी वाहने ढकलत नेणार आहेत. या व्यतिरिक्त इतर पद्धतींनीही निषेध कार्यक्रम राबवून केंद्र सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर आणला जाईल. मोदी सरकारच्या ‘करणी व कथनी’मधील फरक निदर्शनास आणून देण्यासाठी या आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.