आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे प्रवासी भाडेवाढीने भाजपचे नेते धास्तावले, तावडे, फडणवीस रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मोठ्या यशाची खात्री बाळगणार्‍या राज्यातील भाजपच्या नेत्यांना मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीमुळे मोठा धक्का बसला आहे. या भाववाढीने मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात भाजपविरोधात नाराजीचे वातावरण पसरल्याने त्याचा थेट विधानसभेच्या किमान 70 पेक्षा जास्त जागांवर परिणाम होऊ शकतो. हे लक्षात आल्याने लवकरच भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ दिल्लीत जाणार असून भाववाढ कमी करण्याचे आवाहन रेल्वेमंत्र्यांसह पक्षश्रेष्ठींना करणार आहेत.

विधानसभेच्या मुंबईत 36, ठाण्यात 24 तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील धरून 70 पेक्षा जास्त जागा मुंबई आणि परिसरात आहेत. मुंबई व ठाण्यातील चाकरमानी हे थेट रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गशी संबंधित असून मुंबईचे पडसाद या सर्व जिल्ह्यांमध्ये पडतात. केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आल्याने ‘अच्छे दिन आ गये’ असा आशावाद निर्माण झाला होता. मात्र सरकार येऊन दीड महिनाही उलटला नसताना रेल्वे भाववाढीचा मोठा फटका बसल्याने भाजपबद्दल लोकांच्या मनात नाराजी पसरली आहे. रेल्वे तिकीट व पासात दुप्पट आणि चौपट वाढ होणार असल्याने मुंबई व ठाणेकर संताप व्यक्त होत आहे. मोदी सरकारविरोधात आता असंतोष व्यक्त होताना दिसत आहे. याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकांवर परिणाम होईल हे लक्षात घेऊन विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे व मुंबई व ठाण्यातील भाजपचे खासदार दिल्लीत जाऊन रेल्वेमंत्री सदानंद गौडांची भेट घेतील. त्यानंतर मोदींनाही भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत.

विधानसभेला फटका
रेल्वे भाडेवाढीचा केंद्रातील भाजप सरकारवर फारसा परिणाम होणार नसला तरी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप व महायुतीतील मित्रपक्षांच्या जागांवर होऊ शकतो, असे भाजपच्या राज्यातील नेत्यांना वाटते. विनोद तावडे व भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी ही भीती बोलून दाखवली.

शिवसेनेतही नाराजी
रेल्वे भाडेवाढीमुळे शिवसेनेतही नाराजी आहे. मुंबई परिसरातील मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला मोठा फटका बसणार असल्याने ही भाडेवाढ कमी झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सुचवले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान व रेल्वेमंत्र्यांची भेट घेणार आहे.

काँग्रेसकडून सविनय आंदोलन
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सोमवारी मुंबईत रेल्वे भाडेवाढीविरोधात आंदोलन केले. ठाण्यावरून मुंबईपर्यंत विनातिकीट प्रवास करून सविनय आंदोलन केल्याचे माणिकराव म्हणाले. केंद्राने ही 14 टक्के भाडेवाढ मागे न घेतल्यास 25 जूनला राज्यभर रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही माणिकरावांनी दिला. मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करणार्‍या कॉँग्रेसच्या महिला सदस्या.