आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Agree On Formula Of 26 22 Lok Sabha Seats, Appoint Obsevero

लोकसभेच्या 26-22 जागांवर काँग्रेस राजी!, मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने लढवलेल्या जागांचा आढावा घेण्यासाठी आणि या भागातील पक्षाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कॉँग्रेसने गुरुवारी 26 मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे यंदा 26 पेक्षा जास्त जागा लढविण्याचा दावा करणा-या कॉँग्रेसने गेल्या वेळच्याच मतदारसंघात निरीक्षकांची नियुक्ती केल्यामुळे राष्‍ट्रवादीचा 26-22 चा फॉर्म्युला या पक्षाने अप्रत्यक्ष मान्य केल्याचेच स्पष्ट झाले आहे.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी 26 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी काही पदाधिकारी आणि मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. हे पदाधिकारी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल संबंधित मतदारसंघासाठी नेमलेल्या मंत्र्यांकडे सादर करतील. या अहवालातील मुद्द्यांचा विचार करून आचारसंहिता जाहीर होण्यापुर्वी राहून गेलेले विषय तातडीने मार्गी लावण्याचा पक्षाचा विचार आहे.
आघाडीतील जागावाटपात यंदा राष्‍ट्रवादीला गतवेळी दिलेल्या 22 पेक्षा कमी जागा देण्याचे दावे कॉँग्रेसचे राज्यातील नेते करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी मात्र 22 जागांच्या मागणीवर ठाम असून, त्यांनी अन्य पर्याय खुले असण्याची धमकीही दिलेली आहे. या मुद्द्यांवरून दोन्ही मित्रपक्षात तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने केवळ 26 मतदारसंघातच निरीक्षक जाहीर केल्याने राष्‍ट्रवादीत समाधानाचे वातावरण आहे. राष्‍ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, ‘आम्ही अगोदरच याच फॉर्मुल्यावर चर्चेसाठी काँग्रेसला आमंत्रित करत होतो. अखेर उशिराने का होईना अखेर ते चर्चेला तयार झाले. या निवडणुकांच्या वेळी आघाडीत एकदोन जागांची अदलाबदल केली जाईल मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला मात्र तोच राहिल.’
मुख्यमंत्री- पटेल चर्चा
सुत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात जागा वाटपाबाबत दोनदा चर्चा झाली आहे. त्यानुसार 22 - 26 चाच फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे जागावाटपाच्या तहात राष्ट्रवादी सरशी साधेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
रावेर, जालना, औरंगाबादेत बदलाची चिन्हे
राष्‍ट्रवादीकडे असलेली जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा कॉँग्रेसच्या मनिष जैन यांना हवी आहे. तर हिंगोलीची राष्‍ट्रवादीची जागाही युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव यांच्यासाठी मागण्यात येणार आहे. तसेच सदाशिव मंडलीक यांच्यामुळे सहयोगी सदस्याच्या रुपाने मिळालेल्या कोल्हापूरच्या जागेवरचा हक्कही काँग्रेसला सोडायचा नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीला जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांच्यासाठी रायगड हा कॉँग्रेसकडील मतदारसंघ हवा आहे. तसेच औरंगाबाद किंवा जालना हे मतदारसंघ राष्‍ट्रवादीसाठी घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे. या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे आमदार सतिश चव्हाण व उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना रिंगणात उतरवण्याची राष्‍ट्रवादीची तयारी आहे.