मुंबई- लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभेतील पराभवाच्या शक्यतेने अस्वस्थ झालेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनीच मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. ‘आता तरी निर्णय घ्या; अन्यथा पुढचा काळ कठीण जाईल,’ अशा शब्दांत काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी चव्हाण यांना घरचा आहेर दिला.
अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान घरचा आहेर मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्र्यांनी काही वेळाने सभागृहाबाहेर जाणे पसंत केले.
‘हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा, वसंतदादांचा म्हणून ओळखला जातो. मुख्यमंत्री साहेब, तुम्हालाही जर या राज्याच्या इतिहासात स्थान मिळवायचे असेल तर एखादा तरी धडाकेबाज निर्णय घ्या,’ अशा शब्दांत बाबा सिद्दिकी यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. नवाब मलिक यांनीही निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी केली. अंमलबजावणीच्या कामात कुचराई करणार्यांवर कठोर कारवाई करा, असेही ते म्हणाले. आपल्या मुद्द्याच्या उदाहरणादाखल त्यांनी शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमधल्या त्रुटींकडेही सरकारचे लक्ष वेधले.