आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress And Nationalist Congress News In Marathi, Alliance, Divya Marathi

काँग्रेसचा राष्‍ट्रवादीला 13 जागी दगाफटका,समन्वय समितीची बैठक तापणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँगे्रस-राष्‍ट्रवादीची आघाडी होती तरी प्रत्यक्षात या पक्षांनी एकमेकांना सहकार्य केले नसल्याचे चित्र समोर आले आहे. 21 पैकी 13 मतदारसंघांत काँगे्रसने राष्‍ट्रवादीविरुद्ध प्रचार केल्याची यादीच राष्‍ट्रवादीने तयारी केली असून 10 मे रोजी होणा-या पक्षाच्या बैठकीत शरद पवार ती सादर करतील. यानंतर समन्वय समितीच्या बैठकीत हे प्रकरण तापू शकते.

नगर, परभणी, उस्मानाबादेत दगाफटका
* अहमदनगर
राष्‍ट्रवादीकडून राजीव राजळेंच्या विरोधात राधाकृष्ण विखे यांनी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांना मदत केली. राजळे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. विखे व थोरात यांच्यातील वादाचा फटका राजळे यांना बसला असून विखे पाटील यांच्याकडून राजळे यांना पाडण्यासाठी सर्व
आघाड्यांवर प्रयत्न झाल्याचे पुरावेच राष्‍ट्रवादीकडे आहेत.
* परभणी
विजय भांबळे यांच्याविरोधात काँगे्रसच्या रामप्रसाद बोर्डीकरांनी उघड प्रचार केला. या ठिकाणी बोर्डीकरांनी शिवसेनेच्या उमेदवारासाठी ताकद वापरली असून त्यांच्याविरोधात कारवाई झाली असली तरी यामुळे भांबळेंची जागा धोक्यात आली. एवढे कमी म्हणून की काय, आघाडीला पाठिंबा देणारे आमदार सीताराम घनदाट यांनीही भांबळेंच्या विरोधात काम केले.
* माढा
विजयसिंह मोहिते यांच्या विरोधात आमदार जयकुमार गोरेंनी काम केल्याचे पुरावे राष्ट्रवादीकडे आहेत. गोरे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी साता-यात उदयनराजे भोसलेंच्याच विरोधात निशाण फडकवले होते. उस्मानाबादला पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात दुग्धविकास मंत्री मधुकर चव्हाणांनी आपली शक्ती उपयोगात आणल्याचे राष्ट्रवादीकडे पुरावे आहेत.

* रायगड
राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरेंविरोधात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुलेंनी रायगड मतदारसंघात सुरुवातीपासून विरोधात प्रचार केला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करूनही शेवटच्या चार दिवसांत अंतुलेंनी तटकरेंच्या विरोधात पत्रके काढली. विशेषत: मुस्लिमबहुल भागात तटकरेंना मत टाकू नका, असे उघडपणे सांगण्यात आले. तटकरे पराभूत झाल्यास राष्ट्रवादीसाठी मोठा फटका असू शकतो.
* नाशिक
छगन भुजबळांविरोधात सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटेंनी बंड पुकारले होते. बुलडाण्यात कृष्णकांत इंगळेंना काँग्रेसचे आमदार दिलीप सानंदांनी मदत केली नाही. अमरावतीत नवनीत राणांविरोधात काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर, राजेंद्र शेखावत यांच्यासह अपक्ष आमदार बच्चू कडू उभे ठाकले होते. कोल्हापुरात माजी आमदार दिनकर जाधव, माजी आमदार संजय घाडगेंनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिकांच्या विरोधात प्रचार केला.

समन्वय समितीच्या बैठकीत जाब विचारणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी 10 मे रोजी होणार्‍या राष्ट्रवादीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांच्या असहकाराविषयी अगोदर चर्चा होईल. नंतर दोन्ही काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक होणार असून या वेळी कॉँग्रेसच्या दगाबाजीचे सर्व पुरावे राष्ट्रवादीकडून सादर करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीकडून समन्वय समितीत अजित पवार, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, आर.आर.पाटील व डॉ.गजानन देसाईंचा समावेश आहे. तर काँग्रेसकडून या समितीत पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, नितीन राऊत व शरद रणपिसे आहेत.
नवी मुंबई : राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांना काँग्रेसचे उमेदवार मुजफ्फर हुसेन यांनी सुरुवातीपासून विरोध केला होता. नाईक यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारही मुजफ्फर यांनी उभा केला. तसेच नवी मुंबईतील काँग्रेसच्या नामदेव भगत, रमाकांत म्हात्रेंनी नाईकांविरोधात आघाडी उघडली होती.