आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Congress And Ncp Loksabha Seat Issue News In Marathi, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉंग्रेसचे लोटांगण: पवारांची मोदी मात्रा लागू; अखेर 22 जागा पदरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना क्लीन चिट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची त्यांच्याशी कथित भेट या दोन मुद्दय़ांद्वारे दबाव तंत्राचा हुकुमी वापर करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेससमोर काँग्रेसने सोमवारी लोटांगण घातले. उभय पक्षांच्या नेत्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत 2009 च्याच जागावाटप सूत्रावर सहमती झाली आहे. राष्ट्रवादीला सोळापेक्षा जास्त जागा देण्याच्या विरोधात असलेल्या काँग्रेसने अखेर 22 जागा दिल्या. काँग्रेस स्वत: 26 जागांवर लढणार आहे.

पवार यांनी मोदींची भेट घेतल्याची बातमी योग्य वेळी माध्यमात प्रसिद्ध झाली. शिवाय राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदी यांना गुजरातमधील दंगलीप्रकरणी एकाही न्यायालयाने दोषी ठरविलेले नाही असे सांगून अप्रत्यक्षपणे मोदी हे आता राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य राहिलेले नाहीत, असे सूचितही केले होते. 2009 मध्येही पवारांनी हेच सूत्र वापरून सर्व पर्याय खुले आहेत, असे वक्तव्य केले होते आणि हव्या त्या जागा पदरात पाडून घेतल्या होत्या.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका, राहुल गांधी यांना टोला लगावूनही काही दिवसांपासून काँग्रेसकडून जागावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी काही पुढाकार घेतला जात नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची अस्वस्थता शिगेला पोहोचली होती. आम्ही आमच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू असा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादीला पुन्हा माघार घ्यावी लागली आणि ही यादी घोषणा थांबवावी लागली होती. यानंतरच राष्ट्रवादीने मोदी-मार्ग चोखाळायचे संकेत दिले आणि अखेर काँग्रेसला नमते घ्यावे लागले.

अदलाबदलीवर खल
जागावाटपावर राष्ट्रवादीच्या समोर लोटांगण घालावे लागल्यानंतर आता किमान जागा अदलाबदलीत आपल्याला सोयीच्या जागा मिळविण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. रावेर आणि हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला हवी आहे. राष्ट्रवादीलाही पुण्याची जागा हवी आहे. यावर लवकरच निर्णय होईल, असेही सांगण्यात आले.