आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मिशन मुंबई’: मनसेच्या बालेकिल्ल्यात अजित पवार घेणार जाहीर सभा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवसेनेची पकड ढिली झाल्याचा फायदा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकाचवेळी महाराष्ट्राच्या राजधानीकडे मोर्चा वळवला आहे. सार्वत्रिक निवडणुकाही जवळ येत असून मुंबईकडे पूर्वीसारखे दुर्लक्ष करून चालणार नाही हे दोन्ही पक्षांनी पुरेपूर ओळखले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुंबईतील नेत्यांची बैठक घेतली, तर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आपल्या नेत्यांशी बोलण्यासाठी खास दिल्लीहून आले होते.

शिवसेनेची ताकद कमी होत असली तरी त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न मनसेकडून होत आहे. राज ठाकरे यांनी मराठी आणि हिंदुत्ववादी अजेंडा राबवण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी मुंबईमध्ये शिवसेना व मनसे अशी दुहेरी लढत द्यावी लागणार असल्याचे ओळखून अजित पवार यांनी मनसेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या मतदारसंघात स्वत: पवार सभा घेणार असून तेथील मराठी मतांना खेचण्याचा प्रयत्न करणार आहेत.

मनसेची दावेदारी कायम
शिवसेनेनंतर मुंबईवर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे मनसेही उत्सुक असून त्यांच्याकडून काय रणनीती आखली जाते हेसुद्धा पाहावे लागेल. मुंबईतील मराठी मतांना भावनिक आवाहन करून आतापर्यंत राज यांनी बरेच यश पदरात पाडून घेतले. मात्र, वारंवार भावनिक आवाहनालाच मतदार प्रतिसाद देत नाहीत याची त्यांनीही कल्पना आहे. ते सध्या राज्याच्या दौर्‍यावर असून तेथील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत आपल्याला आणखी कोठे संघटना वाढवता येईल याची चाचपणीही केली जात आहे, पण मुंबईला तेही सोडणार नाहीत. त्यामुळे येत्या काळामध्ये मुंबईसाठी हे तीनही पक्ष जोर-बैठका काढताना दिसतील, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीचा मनसेशी पंगा
अजित पवारांबद्दल राज यांनी काढलेल्या अनुद्गारामुळे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये ठिगणी पेटलीच आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष आणखी वाढू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मात्र, मनसेप्रमाणे राष्ट्रवादीचा केवळ मराठी हा कार्यक्रम नाही. त्यामुळे मनसेला विरोध केल्यामुळे उत्तर भारतीयांचीही मते त्यांना मिळू शकतात, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची मते मनसेमुळे कमी झाल्याचेच पुढे आले आहे. त्यामुळे मनसेशी टक्कर घेऊनच मुंबईमध्ये पक्षाची बांधणी करायची, असा आदेशच अजित पवार यांनी दिल्याचे पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे.

ठोस कार्यक्रमाचा काँग्रेसकडे अभाव
आतापर्यंत परप्रांतीय मते काँग्रेसकडे आपोआप वळत होती, पण पक्षांतर्गत गटबाजीने मुंबईतील संघटना पोखरून निघाली आहे. मुंबई अध्यक्षपदाचा निर्णयही अद्याप घेता आलेला नाही. त्यामुळे पक्षाचे काहीच काम मुंबईत सुरू नसल्याबद्दल अनेक नेते खासगीत नाराजी व्यक्त करतात. याच परिस्थितीमध्ये मुंबई पालिकेच्या निवडणुकीमध्ये संधी असूनही ती काँग्रेसने गमावली. तसेच मुंबईतून पाच खासदार काँग्रेसचे असले तरी त्यांच्यात समन्वय नाही. तसेच ते सर्व पुन्हा निवडून येतील याची खात्रीही नाही. त्यामुळे मुंबईकडे लक्ष देण्याची गरज असून राहुल गांधींनीच येथे येऊन नेते व पदाधिकार्‍यांची हजेरी घेतली. मात्र, राष्ट्रवादीप्रमाणे कोणताही कार्यक्रम अद्याप काँग्रेसकडे नाही.