आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस नेमणार प्रभारी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सध्या प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभारी आहे. मात्र, मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी व कार्यकर्ते अाणि प्रदेश काँग्रेस यांच्यात संवाद राहण्यासाठी राज्यातील सर्वच्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांत प्रभारी नेमण्याचा आपण निर्णय घेतला अाहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी मुंबईत दिली.

राज्य पातळीवरील पक्ष संघटनेमध्ये काही बदल पंधरा दिवसांत केले जाणार आहेत. मात्र, राज्यातील पक्षाच्या सर्व पदांवर नवीन पदाधिकारी नेमले जातील असे नाही, परंतु प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक प्रभारी नियुक्त केला जाईल. त्यांच्या नेमणुका पुढच्या दोन आठवड्यांत केल्या जातील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

चार महिन्यांपूर्वी फडणवीस सरकारने दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे प्रवेश केजीपासून देण्याचा निर्णय केला. आता सरकार पहिलीपासून प्रवेश देणार म्हणते आहे. त्याप्रमाणेच मराठा आरक्षणांतर्गत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले, त्यांचे शिक्षण शुल्क देण्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात काहीही तरतूद केली नाही. सरकारच्या अशा धरसोड निर्णयाचा हजारो पालकांना फटका बसल्याचा अारोप चव्हाण यांनी केला.

पवारांची भविष्यवाणी खरी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळी राज्यातील शिवसेना-भाजप सरकार कोसळेल, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले भाकीत फडणवीस सरकार सध्या ज्या पद्धतीने निर्णय घेते आहे, त्यामुळे खरे ठरण्याची दाट शक्यता अाहे, असे चव्हाण म्हणाले.

अाैरंगाबाद मनपात विरोधी पक्ष आम्हीच
एमआयएम महाराष्ट्रात मान्यताप्राप्त राजकीय पक्ष नाही. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेत जरी काँग्रेसचे नगरसेवक एमआयएमपेक्षा कमी असले, तरी आम्हालाच विरोधी पक्षनेते पद मिळेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.