आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ, कर्जमाफीसाठी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विविध नैसर्गिक संकटांनी होरपळून निघालेल्या राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी व आर्थिक पॅकेज, पेट्रोल-डिझेलच्या दरात क्रूड ऑइलच्या घसरत्या किमतीच्या प्रमाणात कपात आदी विविध मागण्यांसाठी सोमवारी काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाला संपूर्ण राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना आंदोलनाची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्याच्या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात ठिकठिकाणी आंदोलन झाले. महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआयसह काँग्रेसचे विविध विभाग व सेलचे कार्यकर्ते आंदोलनात
सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव ग्रामीण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, ठाणे, वसई-विरार, पालघर, मीरा-भाईंदर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, जालना, परभणी, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, बुलडाणा, वाशीम, अकोला, अकोट, अमरावती, यवतमाळ, सांगली, कोल्हापूर, सातारा, कराड, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन शांततामय मार्गाने पार पडले.
अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनाला जनतेचाही पाठिंबा व सहानुभूती मिळाली. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपासून घूमजाव केल्याने सर्वसामान्यांमध्येही नाराजी, संताप व फसवणुकीची भावना असल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.

या आहेत मागण्या
*शेतक-यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी
*पेट्रोल व डिझेलचे दर कमी करावेत
*भूमी संपादन कायद्यातील शेतकरीविरोधी दुरुस्त्या मागे घ्याव्यात
*दरेगाव - मालेगाव रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे
*सबसिडीसाठी शून्य बॅलेन्सवर बँक खाते उघडावे
*केशरी शिधापत्रिकाधारकांना १० किलो तांदूळ व ५ किलो गहू मिळावा
*विधवा, अपंग, निराधार, वृद्ध यांचे अर्ज मंजूर करण्यात यावेत.

राणेंबाबत बोलण्यास नकार
राणे कुटुंबीयांच्या स्वित्झर्लंड येथील स्विस बँकेतील खात्याबाबत खुद्द नारायण राणे यांनी खुलासा केला आहे. त्यामुळे आपण त्याबाबत काही बोलणार नाही, असेही माणिकराव ठाकरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

सिंधुदुर्ग शांत
मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना वगळून राज्यात सर्वत्र काँग्रेसने सोमवारी आंदोलन केले. नारायण राणे यांना येण्यास विलंब झाल्याने तेथे आंदोलन झाले नाही. असे ठाकरे म्हणाले.

घरापर्यंत आंदोलन
वीज, दुष्काळग्रस्तांना मदत, अन्नसुरक्षा यासंदर्भात राज्यातील भाजपने निवडणूक काळात दिलेली आश्वासने पाळली नाहीत. यापुढे फडणवीस सरकारचे वर्तन असेच राहिल्यास काँग्रेस आपले आंदोलन राज्यातील घराघरापर्यंत नेईल, असेही ठाकरे यांनी या वेळी सांगितले.