आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress, BJP Do Fixing For The Parliament Sitaram Yechuri

संसदेत चर्चा न करण्‍यासाठी काँग्रेस, भाजप यांच्यात फिक्सिंग - सीताराम येचुरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशात भरपूर पैसा आहे. वाढत्या महागाईने खरेदी संपुष्टात आली आहे. नफ्यातील परताव्याची खात्री संपल्याने सोने खरेदी वाढली. त्यामुळे रुपयाचे अवमूल्यन झाले असून देश आर्थिक संकटात आला. मात्र, याची चर्चा संसदेत न करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यात फिक्सिंग झाले. त्यामुळेच संसद वारंवार ठप्प होते, असा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी केला.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी दादर येथे निर्धार सभा झाली. या वेळी ते बोलत होते. लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांच्या पुढाकाराने या निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. येचुरी म्हणाले, संसद ठप्प राहावी अशीच रणनीती काँग्रेस आणि भाजपने आखली आहे. राजकीय पक्षांची ही एक प्रकारची फिकिं्सग आहे. आर्थिक संकटाचे परिवर्तन सामाजिक संकटात होत असून त्यामधून दाभोलकर यांची हत्या झाल्याचे ते म्हणाले.



धार्मिकता जेवढी पवित्र असते, तेवढीच नास्तिकता पवित्र आहे, असे स्पष्ट करत जादूटोणा विरोधी विधेयक संसदेत मंजूर होण्यासाठी डावे पक्ष नेटाने प्रयत्न करतील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या भूमीत दाभोलकर यांच्यासारख्या निधर्मी कार्यकर्त्यांची हत्या होणे, दुर्दैवी घटना असल्याचे मत भाकपचे खासदार डी. राजा यांनी व्यक्त केले. हिंदु राष्ट्र बनवण्याचे उजव्या शक्तीचे स्वप्न कायम दिवा स्वप्नच राहिल, असे भाकीत त्यांनी केले. प्रादेशिक पक्ष वाढीस लागल्यामुळे निधर्मी शक्ती कमकुवत झाल्याचा मुद्दा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी मांडला. विवेकवादाने उत्तर देऊ शकत नसल्यामुळे दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांनी बंदुकीचा सहारा घेतला, असा युक्तिवाद विचावंत प्रा. पुष्पा भावे यांनी निर्धार सभेत केला.

ती माणसं आसारामची
जादूटोणा विरोधी विधेयकाच्या अनेक बैठकीत मी होते. या विधेयकाला दुसर्‍यांचा कसा विरोध आहे, हेच प्रत्येकजण सांगत होता, अशी माहिती देऊन ‘ती माणसं धर्माच्या नव्हे, आसारामच्या बाजूची होती’, असा टोला पुष्पा भावे यांनी निर्धार सभेत लगावला.