माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा जनता दल (धर्मनिरपेक्ष) उमेदवाराच्या प्रचारार्थ मुंबईत आले असताना ‘दिव्य मराठी’चे विशेष प्रतिनिधी संजय परब यांनी त्यांच्याशी संवाद साधला. भाजप व काँग्रेसकडून प्रादेशिक पक्ष संपवण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप देवेगौडा यांनी केला.
प्रश्न : प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होत आहे, असे तुम्हाला वाटते
का?
- सध्या वातावरण तसे दिसत असले, तरी मला तसे मुळीच वाटत नाही. काँग्रेस व भाजपकडून प्रादेशिक पक्षांना हळूहळू संपवण्यासाठी पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्राचे उदाहरण घ्या. भाजपची शिवसेनेबरोबर २५ वर्षांची युती असताना त्यांनी ‘शत प्रतिशत’ भाजप करत ती मोडली. तर काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबरचा १५ वर्षांचा संसार मोडला. मात्र, आता शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी
आपली ताकद आता दाखवून राष्ट्रीय पक्षांची हुकूमशाही मोडून काढायला हवी. महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षाचाच मुख्यमंत्री हवा, असे मला मनापासून वाटते.
प्रश्न : देशात सध्या प्रादेशिक पक्षांची अवस्था कशी आहे?
- ममता बॅनर्जी, मुलायम सिंह, मायावती, नवीन पटनायक, नितीश कुमार, शरद यादव, करुणानिधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, चंद्राबाबू नायडू या सर्वांनी आपले अस्तिव कायम ठेवले आहे. या सर्वांच्या यशाचा आलेख कमी-जास्त असला, तरी त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळे भविष्यात या सर्व नेत्यांचे पक्ष आपला जनाधार गमावणार नाहीत. उलट अस्तिवाच्या लढाईसाठी ते मोठ्या ताकदीने उभारी घेतील.
प्रश्न : यूपीए सरकार विरोधातील मते तिस-या आघाडीला का मिळवता आली नाहीत?
- यूपीए सरकार विरोधात लोकांच्या मनात प्रचंड राग असून सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन तिस-या आघाडीचा सक्षम पर्याय निर्माण करायला हवा, असे मी शरद पवार यांच्यासह नितीश कुमार, लालू प्रसाद, मुलायम, पटनायक यांना सांगितले होते. लोकांची तशी इच्छा असल्याचेही त्यांना पटवून दिले; पण आमची तिसरी आघाडी एकत्र येऊ शकली नाही, हे दुर्दैव म्हणायला हवे.
नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस विरोधातील राग अचूक ओळखत वातावरण बनवले. त्याचा फायदा त्यांना मिळाला. मात्र, भविष्यात तिस-या आघाडीतील सर्व पक्षांना लोकच एकत्र येण्यासाठी भाग पाडतील.
प्रश्न : यापुढे प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात?
- हरियाणाच्या निवडणुकीच्या निकालानंतर प्रादेशिक पक्षांची ताकद दिसेल. हरियाणात ओमप्रकाश चौटाला यांना पाठिंबा देण्यासाठी मेरठमध्ये रविवारी मी, नितीशकुमार, शरद यादव, मुलायमसिंग एकत्र येऊन एक भव्य रॅली काढणार आहोत. या रॅलीचा चौटालांच्या पक्षाला फायदा होईल, असे मला ठामपणे वाटते. भविष्यातही देशातील सर्व प्रादेशिक पक्षांच्या मागे आम्ही अशी ताकद उभी करू. प्रादेशिक पक्ष एकत्र आले, तर भाजप व काँग्रेसला निश्चितच हादरे बसतील.
प्रश्न : देशाच्या पंतप्रधानांनी तब्बल २५ सभा घेऊन राज्याच्या निवडणुकांमध्ये लक्ष देण्याची इतकी गरज आहे का?
- मला वाटते हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भाजपची सर्व मदार मोदींनी आपल्या एकट्याचा खांद्यावर घेतलेली दिसते आणि त्यासाठीच ते जिवाचे रान करत आहेत. मात्र, देशाच्या केंद्रस्थानी फक्त आणि फक्त आपणच राहण्याचा अट्टहास यामधून दिसून येतो.