आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशोक चव्हाण पर्यटनाला; कार्यकर्ते उन्हात, काँग्रेसने राज्यभर पाळली ‘पुण्यतिथी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कायमच सत्तेत रमलेले काँग्रेस नेते विराेधी पक्ष म्हणून प्रभाव पाडूच शकत नाहीत, याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा अाला. केंद्रातील मोदी सरकार निष्प्रभ ठरल्याचा अाराेप करत त्यांच्या वर्षपूर्तीला या सरकारची ‘पुण्यतिथी’ पाळण्याची घाेषणा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण स्वत: मात्र मंगळवारी झालेल्या या अांदाेलनात सहभागी झाले नाहीत. पक्षाचे कार्यकर्ते उन्हातान्हात रस्त्यावर माेदींविराेधात आंदोलन करीत असताना चव्हाणांनी मात्र विदेशात थंड हवेच्या ठिकाणी आराम करणे पसंत केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी साजरी करण्याचा कार्यक्रम घोषित केला. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या या कार्यक्रमांना स्वत: चव्हाण हजर राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र ते या आंदोलनाकडे पाठ फिरवून विदेशात थंड हवेच्या ठिकाणी आराम करायला निघून गेले. अाधीच सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा अाहे.

त्यातही प्रदेशाध्यक्षच आंदोलनात सामील होण्याऐवजी आराम करण्याला प्राधान्य देत असेल तर कार्यकर्त्यांनी का पोलिसांचा मार खावा, अशी भावनाही सामान्य कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती. यापूर्वीही १४ एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे इंदू मिलमध्ये अांबेडकर स्मारकासाठी काँग्रेसने पुकारलेल्या आंदोलनात सामील होण्यास आलेले चव्हाण आपल्या ऑडी कारमधून उतरलेही नव्हते. या वेळेसही त्यांनी तोच कित्ता गिरवला.

आरोग्य तपासणीसाठी गेले
या संदर्भात अधिक माहितीसाठी अशाेक चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र काँग्रेसमधील सूत्रांनी ते फिरण्यासाठी नव्हे तर वैद्यकीय उपचारासाठी गेले असल्याचे सांगण्यात अाले.

मुंबईसह राज्यात मोर्चे
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदास एक वर्ष पूर्ण होत असताना मंगळवारी काँग्रेसने राज्यभर या सरकारच्या अच्छेदिनची ‘पुण्यतिथी’ पाळली. मुंबई विभागीय काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले होते. गिरगाव चौपाटीवरून सुरू होणाऱ्या या मोर्चात सुरुवातील कमी लोक आल्याने पोलिसांनी धरपकड करून हा मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर हळूहळू हजारोंच्या संख्येत लोक मोर्चास्थळी आल्यानंतर काँग्रेसने एक भव्य रॅलीच काढली. ही रॅली आझाद मैदानात आल्यानंतर तिचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या सभेत निरुपम यांनी मोदींवर तोंडसुख घेतले. ‘आम्ही मोदींचा सूट ४ लाखांचा असल्याची टीका केल्यावर आमची माहिती चुकीची असल्याचा दावा भाजपने केला होता. त्यांचा हा दावा खराच निघाला. कारण हा सूट ४ लाखांचा नव्हे तर ४ कोटींचा निघाला. काळा पैसा १०० दिवसांत परत आणून १५ लाख जमा करण्याचा मुद्दा असो की पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याचा मुद्दा, या सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले,' अशी टीका निरुपम यांनी केली. मुंबईसह काेकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातही अांदाेलने झाली. वाशिममध्ये तर कार्यकर्त्यांनी मुंडन करून निषेध केला.

उत्सव कसले करता : विखे
‘देशात शेतकऱ्यांच्या अात्महत्या वाढत असताना वर्षपूर्तीचे उत्सव कसले साजरे करता?’ अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत केंद्रातील सरकारवर टीका केली. ‘महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना न्याय देण्यात केंद्र आणि राज्यातील सरकारही अपयशी ठरले असून राज्यातील दुष्काळग्रस्तांना तत्काळ कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. दुष्काळाच्या लाटेत राज्यातील शेतकरी होरपळून निघत असताना मुख्यमंत्र्यांना आढावा बैठका घ्यायला किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भेट द्यायला वेळ नाही. पालकमंत्री तर फिरकूनही पाहत नाहीत. केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे,’ अशी टीका त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...