आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या महापौरांना बांगड्यांचा आहेर देणा-या काँग्रेस नगरसेविकेला शिवसेनेकडून मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सवर उद्यान करावे, याबाबतचा ठराव चर्चा न करताच मंजूर करण्याची सूचना देणा-या महापौरांना कॉँग्रेसच्या नगरसेविकास शीतल म्हात्रे यांनी बांगड्यांचा आहेर दिला. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविकांकडून म्हात्रे यांना मारहाण करण्यात आली. मंगळवारी महापालिकेच्या सभेत हा राडा झाला.


मे अखेर करार संपत असलेल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क उभारावे, अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्याबाबतचा आराखडाही मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. मात्र, सरकारसह सर्वच राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला होता. तरीही शिवसेना मात्र आपली मागणीवर ठाम आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी याबाबत ठरावाची सूचना दाखल केली होती. ती सूचना मंगळवारी पालिकेच्या सभागृहात चर्चेला आली. या विषयावर चर्चा करण्यासाठी विरोधक तयारीत होते. परंतु सभागृहाचे अध्यक्ष महापौर सुनील प्रभू यांनी रेसकोर्सची ठरावाची सूचना चर्चेविना मंजूर केली. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस, राष्टÑवादी, मनसे आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेकांनी सभागृहाचे कामकाज बंद पाडले. या गोंधळातच काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौरांच्या डायसवरती बांगड्या ठेवल्या. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या महिला नगरसेवकांनी म्हात्रे यांच्याकडे धाव घेतेली. त्यांच्यात जोराची बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले. यात म्हात्रे यांचे मंगळसूत्र तुटले, कपडे फाटले तसेच हातावर जखमाही झाल्या.


मारहाण करणा-यांना निलंबित करा : म्हात्रे
‘मला बांगड्याचा आहेर देवून म्हात्रे यांनी मुंबईकरांचा अपमान केला आहे. त्याबद्दल म्हात्रे यांनी माफी मागावी,’ असे महापौर सुनील प्रभू म्हणाले. तर मारहाण करणा-या शिवसेना नगरसेविकांना निलंबीत करावे अशी मागणी म्हात्रे यांनी आयुक्तांकडे केली आहे. सभागृहातील गोंधळाचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी सांगितले.


खदखद बाहेर पडली
महापालिकेत गेली 20 वर्षे सत्तास्थानी असलेली शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर बॅकफूटवर गेली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाला जागा शोधण्यात पालिकेतील सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. स्मारकाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. काँग्रेसविरोधाची ती खदखद शिवसेनेच्या नगरसेविकांच्या कृत्यातून बाहेर पडली, अशीच चर्चा पालिका वर्तुळात होती.


कोण आहेत म्हात्रे ?
मारहाण झालेल्या शीतल अशोक म्हात्रे या आर विभागातील केतकीपाडा वॉर्डच्या कॉँग्रेसच्या नगरसेविका आहेत. त्या स्थायी समितीच्या सदस्य असून यापूर्वी त्यांनी बेस्ट समितीवर काम केले आहे. आक्रमक नगरसेविका म्हणून त्या ओळखल्या जातात.