आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारी कारभाराचा पुस्तकातून पंचनामा, सरकारच्या शंभर दिवसांवर काँग्रेसची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप-शिवसेना युती सरकारने आपल्या १०० दिवसांच्या काळात फक्त घोषणा देण्याचे काम केले. प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दुष्काळ, कामगार, उद्योजक व सामाजिक प्रश्नांना न्याय देण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले. घोषणा करण्यापलीकडे या सरकारने काही केले नाही. यामुळे ‘घोषणाबाज सरकार’ अशीच तीन महिन्यांतील त्यांची कामगिरी म्हणता येईल, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ही टीका करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने युती सरकारचा पंचनामा करणारी पुस्तिकाच प्रकाशित केली आहे.

कृषी मालाचे घसरलेले भाव, दुष्काळी, अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्यात आले. ठोस उपाययोजनांअभावी शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली असून सावकारमुक्तीची घोषणा म्हणजे िनव्वळ फसवणूक आहे. परवानधारक सावकारांना शेतीसाठी कर्जच देता येत नाही. त्यामुळे सावकारांच्या नावाखाली हे सरकार नेमके कोणाचे कर्ज माफ करणार आहे, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

पारदर्शक कारभाराचा बोजवारा उडालेला दिसत असून जलसंपदामंत्री गिरीश महाजन लाचेचा प्रस्ताव आल्याचे सांगतात. तर दुसरे मंत्री रामदास कदम मुख्यमंत्र्यांना काळा पैसा स्वीकारू नये, असे आवाहन करत आहेत. टोलमुक्तीची घोषणा फसवी ठरली.

टोलमुक्ती फसवी : सत्तेवर येताच एका फटक्यात टोल रद्द करू, अशी वल्गना करणार्‍या सरकारने नवे टोल सुरू करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर एलबीटी, जकातबाबत ही घूमजाव करण्यात आले. विजेवरील अनुदान रद्द झाल्याने भरमसाट बिले माथी आली आहेत. महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्यावर गुजरातचा डोळा दिसला तो याच काळात. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा डाव खेळला जात आहे, असा काँग्रेसचा आरोप आहे.