मुंबई - गेली पंधरा वर्षे राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसला आता विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे. राज्यातील नूतन भाजप सरकारच्या विरोधात नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी पहिला मोर्चा काढण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे. जवखेडे हत्याकांडाची सीबीआय चौकशी करावी, शेतक-यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत आदी मागण्या मान्य न केल्यास प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा इशारा दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सोपवले. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडे येथे झालेल्या दलित हत्याकांडातील आरोपींच्या शोधासाठी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
राज्यातील कापूस खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे व्यापा-यांनी कमी भावात कापूस खरेदी करणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कापसाला साडेपाच ते सहा हजार रुपये भाव द्यावा, शासकीय कापूस खरेदी तत्काळ सुरू करावी, मका, धान, ज्वारी, डाळींची खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
पावसाच्या लहरीपणामुळे यंदा सोयाबीन उत्पादकांना तडाखा बसला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे उत्पादक आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना एकरी दहा हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.