आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Flag Hoisted On Nandurbar, Dhule, Vashim Zilha Parishad

नंदुरबार, धुळे, वाशीम जिल्हा परिषदांवर कॉंग्रेसचा झेंडा फडकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नंदुरबार, धुळे व वाशीम या तीन जिल्हा परिषदांवर सोमवारी कॉँग्रेसने आपला झेंडा फडकावला. आता राज्यातील 33 पैकी 11 जिल्हा परिषदांची सत्ता कॉँग्रेसच्या ताब्यात आली असून आमचा पक्ष राज्यात नंबर वन ठरला आहे, असा दावा कॉँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
नंदूरबार, धुळे, वाशीम व अकोला जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या, त्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. यात चारपैकी तीन जिल्हा परिषदांचे अध्यक्षपद कॉँग्रेसने पटकावले आहे. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे भारत गावित, तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचेच रामचंद्र पाटील विजयी झाले. धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सरलाताई प्रल्हादराव पाटील, तर उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचेच शिवाजीराव नामदेवराव दहिते विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांना 41, तर विरोधी उमेदवारांना 15 मते मिळाली. वाशीम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या सोनाली जोगदंड तर उपाध्यक्षपदी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे हे विजयी झाले.
अकोल्यात पुन्हा ‘भारिप’
अकोला जिल्हा परिषदेवर सत्ता कायम ठेवण्यात भारिप- बहुजन महसंघाला यश आले आहे. शरद गवई यांची अध्यक्षपदी तर देशमुख गुलाम हुसेन गुलाम नबी यांची उपाध्यक्षपदी सोमवारी निवड झाली. काँग्रेस, राष्‍ट्रवादी कॉँग्रेस व अपक्ष सदस्यांनी वेळेवर साथ दिल्याने भारिप- बहूजन महासंघाचा विजय झाला. तर भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचे महायुती स्थापन करून सत्ता प्रस्थापित करण्याचे मनसुबे धुळीस मिळाले.
14 ठिकाणी मोठा पक्ष
अलीकडेच झालेल्या चार जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष राज्यातील 33 पैकी 14 जिल्हा परिषदांमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 11 जि.प.मध्ये राष्‍ट्रवादी, 4 जि.प.मध्ये भाजप, तीन जि.प. शिवसेना, तर एका जिल्हा परिषदेत भारिप बहुजन महासंघ सर्वात मोठा पक्ष आहे.