आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीत \'बिघाडी\' करणा-या दोन आमदारांना काँग्रेसकडून कारणे दाखवा नोटिस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला महायुती वरचढ ठरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जमिनीवर आलेल्या आघाडीच्या नेत्यांनी दोन्ही पक्षात चांगला संवाद राहील यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, काँग्रेसच्या दोन आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना अडचणीत आणणारी वक्तव्ये केली आहेत तसेच ते प्रचारात सामील होत नसल्याने काँग्रेस पक्षाने या दोघांना कारणे दाखवा नोटिस दिली आहे. दोन दिवसात याबाबत उत्तर द्या नाहीतर कारवाई करू असे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काढलेल्या नोटिसीत म्हटले आहे.
सिंधूदुर्गचे काँग्रेसचे आमदार विजय सावंत यांनी नारायण राणे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. कोकणात खरी काँग्रेस केव्हाच संपली आहे. जी शिल्लक आहे ती राणे काँग्रेस आहे असा हल्लाबोल करीत मी राणे काँग्रेसचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. याचबरोबर परभणीतील काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांचे काम करीत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी काँग्रेसकडे केली होती. राष्ट्रवादीने आपल्या पक्षाचे मंत्री विजयकुमार गावित यांनी आपल्या मुलीला भाजपची उमेदवारी घेऊ दिली म्हणून राष्ट्रवादीने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देत पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे काँग्रेसला बोर्डीकर यांच्यावर कारवाई करणे भाग पडले आहे.
भाजप-शिवसेना युतीने राज्यात छोट्या-मोठ्या पक्षांना एकत्र घेऊन महायुती स्थापन केले आहे. त्यातच राष्ट्रीय स्तरावर भाजपने नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट केले. मोदींना व एनडीएला यावेळीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध वाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात मोदींची अफाट लोकप्रियता असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. राज्यातही महायुतीला सुमारे 30 जागा मिळतील असे सर्वेक्षणात दाखविण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते कमालीचे धास्तावलेले आहेत. या दोन्ही पक्षाची संघटना पातळीवर मजबूत बांधणी आहे. मात्र लोकसभेला वेगळ्या पद्धतीने मतदान होते याचा अनुभव आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढे हे दोन्ही पक्ष चांगल्या पद्धतीने एकत्र आले आहेत व काम करीत आहेत. मात्र, राज्यातील 48 मतदारसंघापैकी 4-5 ठिकाणी आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र आहे. ती बिघाडी मोडून काढण्यासाठी दोन्ही पक्ष मागे-पुढे पाहत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार दोन दिवसात माघार घेतात की काँग्रेस कारवाई करते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.