आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरुपम निघाले ‘गंगास्नाना’ला!, ‘काँग्रेस दर्शन’मधील लेखामुळे नाेटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून संजय निरुपम यांची गच्छंती जवळपास निश्चित झाली आहे. मुखपत्र असलेल्या ‘काँग्रेस दर्शन’ मासिकातून नेहरू तसेच सोनिया गांधी यांच्यावर टीका करण्यात आल्याचे प्रकरण निरुपम यांना भोवले आहे. अखिल भारतीय काँग्रेस शिस्तपालन कमिटीने निरुपम यांना बुधवारी शिस्तभंग केल्याची कारणे दाखवा नोटीस बजावली अाहे. ही नोटीस म्हणजे पदावरून पायउतार करण्याचे स्पष्ट संकेत समजले जातात. अस्वस्थ असलेल्या निरुपम यांच्या हातात नोटीस पडल्याने "अब मै गंगा न्हाने जाउंगा,' असे हताश उद्गार त्यांनी काढले.
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष मोतीलाल व्होरा तसेच सरचिटणसीस ए. के. अँटोनी यांच्या सह्यांनिशी ही नोटीस बजावण्यात आली. काँग्रेस दर्शनचे संपादक निरुपम असल्याने या मासिकातील लेखांची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, असे असूनही थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच माजी पंतप्रधान नेहरू यांच्यावर मासिकात टीका झाल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली होती. यासाठी निरुपम यांनी मासिकाचे कार्यकारी संपादक जोशी यांना पदावरून दूर केले होते. मात्र, यानिमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला. याआधी २०१२ ला मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे अजित सावंत यांची मुंबई काँग्रेस सरचिटणीसपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
शिवसेनेमधून आलेल्या निरुपम यांना निष्ठावंत काँग्रेसजनांनी कधी आपले मानलेच नाही. सुरुवातीपासून गुरुदास कामत, मिलिंद देवरा, प्रिया दत्त यांनी त्यांना सहकार्य केले नव्हते. खासदारकी गेल्यानंतर निरुपम यांच्याकडे मुंबई काँग्रेसची धुरा आल्यानंतर तर निष्ठावंतांनी त्यांच्याविरोधात कटकारस्थाने करायला सुरुवात केली. यासाठी निरुपमविरोधी गट एखादे कारण शोधत होते आणि काँग्रेस दर्शनमुळे त्यांना संधी मिळाली.
हटाव माेहिमेला वेग
संजय निरुपम यांच्याविरोधात काँग्रेसमधील माजी खासदारांचाच गट तर एकवटलाच, पण आजी-माजी आमदार नसीम खान, कृपाशंकर सिंह, बाबा सिद्दिकी यांनीही निरुपम हटाव मोहीम उघडली. मंगळवारी काँग्रेस नेत्यांमध्ये झालेली धक्काबुक्की याचे उदाहरण होते. मुंबई अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर निरुपम यांनी राजधानीत काँग्रेसला जिवंत करण्याचा आपल्या परीने जोरात प्रयत्न केला होता. मात्र, निरुपम यांचा हाच अति आत्मविश्वास त्यांना भोवला, अशी चर्चा अाता राजकीय वर्तुळात अाहे.
भाई जगताप किंवा राजहंस नवे अध्यक्ष?
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार भाई जगताप किंवा माजी आमदार राजहंस सिंह यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी चर्चा आहे. मुंबई महापालिका निवडणूक पुढील वर्षी होणार असल्याने हक्काच्या बिगर मराठी मतांसाठी राजहंस सिंह यांना पसंती दिली जाईल. विशेष म्हणजे मुंबई काँग्रेसवर आजही वरचष्मा असलेल्या गुरुदास कामत यांचे विश्वासू सहकारी म्हणून राजहंस हे ओळखले जातात. मराठी तसेच कामगार वर्गातील ओळखीचा चेहरा तसेच सर्वांशी जुळवून घेण्याच्या गुणामुळे जगतापांचे नाव निश्चित केले जाईल, असे बाेलले जाते.
बातम्या आणखी आहेत...