आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leade Narayan Rane Comment On Sharad Pawar

शरद पवारांची भूमिका साशंक; काँग्रेस मात्र तसूभरही हलणार नाही-राणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘शिवसेना सत्तेमधून बाहेर पडली तरी आपला पक्ष स्थिर सरकारसाठी भाजपला पाठिंबा देणार नाही,’ असे भलेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणत असले तरी त्यांचा काही भरवसा नाही. त्यांची भूमिका कायम साशंक असते. ते जेव्हा ‘नाही ’म्हणतात तेव्हा त्यामधून ‘होय’ असा अर्थ निघतो आणि ‘होय’ म्हणतात तेव्हा ‘नाही’ असे समजायचे. त्यामुळे भाजप सरकार कोसळले तर राष्ट्रवादी काँग्रेस काहीही करू शकते,’ असा टोला काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी लगावला. काँग्रेस मात्र भाजपविरोधी भूमिकेवरून तसूभरही हलणार नाही, असे राणेंनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता सुरुवातीलाच भाजपला पाठिंबा दिला होता, हे लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे आता सरकार कोसळले तर फडणवीस सरकारला मदत करणार नाही, या पवारांच्या विधानावर कोणाचा विश्वास बसणार नाही, याची आठवण राणेंनी करून दिली. याच वेळी सत्तेत राहून एकमेकांच्या नावाने शिमगा करणाऱ्या भाजप व शिवसेनेवर राणेंनी टीका केली. ‘सत्तेत येण्यापूर्वी आश्वासनांची खैरात करणारी भाजप लोकांची कामे करण्यात साफ अपयशी ठरली आहे. तर शिवसेना लाचारासारखी सत्तेत बसली आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना भाजप िवचारत नाही, असे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री म्हणतात खरे; पण हिंमत असेल तर मंत्रिमंडळ बैठकांना जाऊ नका. मात्र स्वाभिमान सेनेत राहिला कुठे?’ असा सवाल राणेंनी केला.

‘बिहार’साठी भूमिपूजन
डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण रद्द झाले पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने त्याचा परिणाम होऊन बिहार निवडणुकीत त्याचा भाजपला फटका बसतोय की काय, या भीतीने भूमिपूजन उरकण्यात आल्याचे राणे म्हणाले.

शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवावा!
नरेंद्र मोदी यांची ओळख जगाला आहे ती गोध्रा व अहमदाबादमुळे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली होती. ती पंतप्रधानांचा अपमान आहे. याबद्दल भाजपने केंद्र तसेच राज्य सरकारमधून शिवसेनेची हकालपट्टी करायला हवी होती. पण भाजपने बोटचेपी भूमिका घेतली. शिवसेना सध्या सोयीचे राजकारण करत असून पाकिस्तानमधील खेळाडू, कलावंतांना आपल्या सोयीने तसेच समोरची माणसे बघून विरोध करण्याची त्यांची ही सवय मी पाहिली आहे, असे राणे म्हणाले.