आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Narayan Rane Comment On Congress And NCP At Mumbai

विरोधक निष्प्रभ, मंत्र्यांचे राजीनामेच घेतले असते; राणेंचा काँग्रेस-NCPला घरचा आहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- वांद्रे पोटनिवडणुकीतील पराभवानंतर विजनवासात गेलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या सक्रिय होत आपल्याच पक्षावर तोफ डागली. ‘अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादी हे विरोधी पक्ष म्हणून सपशेल अपयशी ठरले आहेत. मी जर विधानसभेत असतो, तर भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घेतल्याशिवाय स्वस्थ बसलो नसतो,' अशा शब्दांत त्यांनी शुक्रवारी या दोन्ही पक्षांना घरचा आहेर दिला. तसेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.

'विरोधी पक्षांच्या नेत्यांची भाषणे पुळचट असतात. सत्ताधाऱ्यांवर त्वेषाने तुटून पडताना दिसत नाही. सध्याचे वातावरण पाहता विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना अपेक्षित तेच काम करताना दिसत आहे. मी विधानसभेत असतो, तर भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय स्वस्थ बसलो नसतो,’ असा आरोप राणेंनी केला. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित वार्तालापात ते बाेलत हाेते. या वेळी राणेंनी त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांपेक्षा आपल्या विरोधी पक्षांचा जोरदार समाचार घेतला. विरोधी पक्ष अपेक्षित काम करत नसल्याने सत्ताधाऱ्यांचे फावले आहे आणि लोकशाहीला बाधक आहे, असे राणे म्हणाले.

भांडणातही सरकार टिकले
भाजप-शिवसेनेचे हे युती सरकार असले तरी त्यांचे सुरुवातीपासून आपसात पटत नाही. मात्र, हे दोघे जण एकमेकांशी भांडतील, प्रसंगी लाथाही घालतील, पण सत्ता सोडणार नाही. हे युती सरकार पाच वर्षे टिकेल. मात्र, पुन्हा निवडणुकीत हे निवडून येणार नाहीत. निशेष म्हणजे आदर्श घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसने अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेतला होता. पण या सरकारमधील पंकजा मुंडे, विनोद तावडे हे मंत्री भ्रष्टाचाराचे एवढे मोठे आरोप होऊनही राजीनामे देणार नाहीत, असे राणे म्हणाले.

दिल्ली बोले, फडणवीस हले!
विरोधी पक्षांप्रमाणेच राणेंनी सत्ताधाऱ्यांवरही टीका केली. ‘मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रशासनावर अजिबात पकड नाही. मुख्यमंत्री भ्रष्टाचारमुक्तीच्या गप्पा मारतात, पण आजही तलाठ्यांपासून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत भ्रष्टाचार राजरोस सुरू आहे. विरोधी पक्षात असताना तालासुरात बोलणारे फडणवीस आज दिल्लीच्या तालावर राज्याचा कारभार करत आहेत. दिल्लीतून भाषणे लिहून येणार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात ती वाचून दाखवणार, असा यांचा कारभार आहे. सर्व काही सावळागाेंधळ असून आमच्या कोकणात जसे ‘दशावतार’, ‘दहीकाले’ होतात तशी या सरकारची परिस्थिती आहे,’ अशी तोफ त्यांनी डागली.