आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Narayan Rane Comment On NCP At M

राष्ट्रवादीमुळेच आमचा पराभव; नारायंण राणेंचा थेट आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपल्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसचा असहकार आणि त्यांनी आपल्याविरोधात रचलेले षड्यंत्र जबाबदार असल्याचा थेट आरोप महसूलमंत्री नारायण राणेंनी केला आहे. गेले दोन दिवस सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकांदरम्यान विविध जिल्हा पदाधिकार्‍यांमध्येही राष्ट्रवादीच्या विरोधातला सूर ऐकू येत होता. पण आता राणेंसारख्या राज्यातल्या मोठय़ा नेत्याने हा आरोप केल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनाही बळ आले आहे.

लोकसभेतल्या पराभवानंतर आता दोन्ही काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. गेले दोन दिवस राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू असलेली खदखद आता राणेंच्या रूपाने उफाळून आली आहे.

निर्णय घेऊनच टाका
गेले दोन दिवस सुरू असलेल्या काँग्रेसच्या चिंतन बैठकीत अनेक पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीसोबत आता घरोबा नको, अशी भावना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसमोर बोलून दाखवली. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीने आपल्याविरोधात काम केले त्यापैकी किती जणांवर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने शिस्तभंगाची कारवाई केली याचा जाबही आपण त्यांना विचारायला हवा, असा आग्रहसुद्धा अनेक नेत्यांनी धरल्याचे कळते. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सत्यशोधन समित्या नेमा : सुशीलकुमार
काँग्रेसच्या पराभवाची नेमकी कारणे काय आहेत हे शोधण्यासाठी स्थानिक पातळीवर सत्यशोधन समित्या स्थापन कराव्यात, अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी चिंतन बैठकीत केली आहे. तसेच मुख्यमंत्री हे सध्याची परिस्थिती हाताळण्यास सक्षम असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या राज्यातल्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी आयोजित केलेल्या मतदारसंघनिहाय चिंतन बैठकांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र हे आरोप प्रत्यारोप टाळून प्रत्येक मतदारसंघात पराभवाची नेमकी कारणे शोधण्यासाठी स्थानिक स्तरावर सत्यशोधन समित्यांची स्थापना करण्याची मागणी शिंदे यांनी केली.