मुंबई -‘आता माघार नाही’ अशी भीमगर्जना करत उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे बंड आता थंडबस्त्यात गेले आहे. कोणत्याही दबावाला भीक न घालण्याचा निर्णय कॉँग्रेस हायकमांडने घेतला असून त्यामुळे राणेंच्या राजीनाम्याबाबत अजून निर्णय झालेला नसल्याचे दिल्लीतील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी निर्णय न घेतल्यास या आठवड्यात राणे आपला पवित्रा जाहीर करतील, असे अजूनही त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या पदरी आलेल्या अपयशानंतर राज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्यासाठी कॉँग्रेसमधूनच विशेष मोहीम सुरू करण्यात आली. नारायण राणे यांनी काही नाराज मंत्र्यांसह यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. त्यात आपल्या मुलाचा पराभवही राणेंच्या जिव्हारी लागला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींनी पुन्हा चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत विधानसभेच्या नेतृत्वाची धुराही त्यांच्याकडेच सोपवली. त्यामुळे राणेंची अस्वस्थता वाढत गेली. कॉँग्रेसमध्ये आता भवितव्य नसल्याचे हेरून त्यांनी 21 जुलै रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर दिल्ली दरबारी जाऊन राहुल गांधी यांची भेट घेऊन आपली नाराजी पक्षाध्यक्षा सोनियांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली. सोनियांनी मात्र त्यांना थेट भेट दिली नाही. त्यामुळे नाईलाजाने राणेंना रिकाम्या हातानेच मुंबईत परतावे लागले होते.
लवकरच होईल निर्णय : प्रकाश
काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले, राणेंचे म्हणणे राहुल गांधी यांनी ऐकून घेतलेले आहे. राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठी लवकरच निर्णय घेतील.’ मात्र ‘लवकरच म्हणजे कधी?’ या प्रश्नाचे उत्तर प्रकाश देऊ शकले नाहीत.
दबावाला थारा नाही
दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणेंचे दबावतंत्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आवडलेले नाही. जे लोक पक्षनेतृत्वावर टीका करतात त्यांना पक्षात थारा नसल्याचेही वरिष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली राणेंबाबतचा निर्णय घेतला जाणार नसून, त्यांना पक्ष सोडून जायचे असेल तर खुशाल जावे, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ नेत्याने दिल्याचे सांगितले जाते.