नवी दिल्ली/ मुंबई - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवरून आता राजकारण पेटले आहे. उत्तर प्रदेश व पंजाबमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी लावलेल्या पोस्टर्समुळे विरोधी पक्षांनीही यावर जोरदार टीका सुरू केली.
केजरीवाल यांनी या कारवाईचा पुरावा मागताच पाकिस्तानी माध्यमांत ते हीरो झाले. दुसरीकडे मंगळवारी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी ही कारवाई बनाव असल्याचे म्हटल्याने गोंधळ उडाला. काँग्रेसने लगेच निरुपम यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे सांगत सावधपणे यातून अंग काढून घेतले. दरम्यान, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही या कारवाईचे पुरावे जनता मागेल, असे वक्तव्य करून याबद्दल संशयाचे वातावरण निर्माण केले.
पुरावे मागणे दुर्दैवी : रविशंकर प्रसाद
केजरीवाल व चिदंबरम यांनी याबाबत पुरावे मागणे दुर्दैवी आहे. हे लोक लष्कराचे मनोबल खच्ची करत आहेत. या लोकांना भारतीय लष्कराच्या क्षमतेबद्दल संशय आहे का?
केजरीवालांनी चूक केली : अण्णा
अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागून चूक केली असल्याचे म्हटले आहे. लष्कराच्या कारवाईबद्दल शंका उपस्थित करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
योग्य वेळी पुरावे होणार जाहीर
सूत्रांनुसार, केंद्र सरकार केवळ राजकीय दबावापोटी पुरावे जाहीर करण्याच्या मन:स्थितीत नाही. कारवाईचे व्हिडिओ चित्रण जसेच्या तसे जाहीर केले, तर जागतिक पातळीवर वाद उद््भवू शकतो. त्यामुळे सध्या तरी हे पुरावे गोपनीय स्थितीत आहेत. योग्य वेळ आल्यावर काही निवडक देशांसमोर ते मांडले जातील.
पुढे वाचा, ‘सर्जिकल स्ट्राइक’वर शंका घेणारे संजय निरुपम ताेंडघशी...