आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leaders Disappoints Over The Nationalist Congress

हाताला ‘घड्याळ’ नकोसे,काँग्रेस नेत्यांमध्ये राष्‍ट्रवादीबाबत नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजायला सुरुवात झाल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वितुष्ट वाढत आहे. राष्ट्रवादी स्वत:च आघाडीतून बाहेर पडली तर बरेच, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये जोर धरू लागला आहे. नको ते राष्ट्रवादीचे लोढणे, असा सूर आता काँग्रेस श्रेष्ठींच्या वर्तुळात आळवला जात आहे.
राज्यात विविध घोटाळ्यांमुळे राष्ट्रवादी बदनाम झाली. सिंचन घोटाळा, अजित पवारांचे बारामती येथे वादग्रस्त वक्तव्य, लवासा, घोटाळेबाज मंत्र्यांना पाठीशी घालण्यासाठी पक्षाने सोडलेली मर्यादा सर्वच कारणांवरून राष्ट्रवादीबाबत जनतेत नाराजी आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधी पक्षांशी राष्ट्रवादीने युती केली. विरोधकांपेक्षा काँग्रेसलाच क्षीण करणे, हा राष्ट्रवादीचा अजेंडा आता उघडकीस आल्याने लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे काँग्रेसच्या उमेदवारांना दगाफटका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादीविरोधातही नाराजीचीही झळ काँग्रेस उमेदवारांना सोसावी लागेल, असे काँग्रेसला वाटत आहे.त्यामुळे राहुल गांधी यांनीच स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली आहे.
एका अंतर्गत सर्वेक्षणात आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चारपेक्षा अधिक जागा मिळणार नसल्याचा निष्कर्ष प्राप्त झाला आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या नाहीत. या वेळेस जर त्यांना केवळ चार-पाच जागा मिळणार असतील तर त्यांच्यासोबत आघाडी करण्याचा केंद्र पातळीवर काय उपयोग? त्यापेक्षा स्वबळावर लढून काँग्रेस मजबूत करणेच योग्य, असा सूर उमटत आहे.