आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी मुख्यमंत्री अंतुलेंवर काँग्रेस कारवाई करणार, हायकमांडकडे अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांनी मावळ व रायगड जिल्ह्यात आघाडी धर्म मोडत शेकापने पाठिंबा दिलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्याने काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करण्याचा विचार करीत आहे. गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानल्या जाणा-या अंतुलेंनी रायगडमध्ये आघाडीच्या सुनील तटकरे यांच्याऐवजी शेकापपुरस्कृत अपक्ष उमेदवार रमेश कदम यांना तर, मावळात लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याची दखल प्रदेश काँग्रेसने गंभीरपणे घेतली असून, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस दिल्लीतील हायकमांड यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीच्या विरोधात भूमिका कोणीही घेतल्यास पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. अंतुले पक्षाचे माजी मुख्यमंत्री तसेच ज्येष्ठ नेते असल्याने त्यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची ते दिल्लीतील हायकमांडच ठरवेल असे ठाकरेंनी स्पष्ट केले.
अंतुले यांनी दोन दिवसापूर्वी रमेश कदम व लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा जाहीर केला होता. तसेच त्यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासह आपल्याच पक्षाच नेते राहुल गांधींवरही टीका केली होती. त्यामुळे अंतुलेंवर कारवाई अटळ असल्याचे बोलले जात आहे.