आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या बैठकीत मोदीविरोध अन् स्वबळाचीच उजळणी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या गुरुवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये सर्वच वरिष्ठ नेत्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेत उत्तराखंडसारख्या आपत्तीमध्येही त्यांनी केलेल्या राजकारणावर जोरदार टीका केली. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर सरचिटणीसपदी नव्याने निवड झालेल्या गुरुदास कामत आणि मुकुल वासनिक यांनी सूचकपणे स्वबळावर लढण्याची भाषा केली. मात्र, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या भाषणांमध्ये स्वबळावर लढण्याविषयी काहीही वक्तव्य केले नाही.

मोहन प्रकाश म्हणाले की, विकासाच्या मुखवट्याखाली धर्मांधता पसरवणार्‍या मोदींचा मुकाबला करणे हे देशासमोरचे मोठे आव्हान आहे. गुजरात राज्याचा देशात क्रमांक पाचवा लागतो, कृषी क्षेत्रात 14वा, उद्योगामध्ये सातवा आणि कुपोषणामध्ये नववा. अशावेळी क्रमांक एकवर असलेल्या महाराष्ट्रामध्ये येऊन ते ‘गुड गव्हर्नन्स’चे धडे काय देणार? मोदींच्या तीन मंत्र्यांनी तुरुंगाची हवा खाल्ली असून लोकायुक्त आल्यानंतर तर संपूर्ण मंत्रिमंडळच तुरुंगात जाईल, अशी खिल्लीही प्रकाश यांनी उडवली. राहुल गांधी काय करतात याकडे भाजपचे लक्ष असते, पण त्यांचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पक्ष मूळ ध्येयापासून कसा भरकटला आहे याचे केलेले वर्णन मात्र ते दुर्लक्षित करतात, असा टोलाही त्यांनी लगावला. गेल्या अनेक वर्षांत देशातील जनतेने धर्मनिरपेक्ष कॉँग्रेसलाच कौल दिला असून आगामी निवडणुकांतही आपलेच सरकार येईल, यात शंका नसल्याचे प्रकाश म्हणाले.

मित्रपक्षालाही निवडून आणा : पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आपला मुख्य विरोधक भाजप असून त्यांनी कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार पुन्हा सुरू केला आहे. त्या पक्षातून नवीन नेतृत्व पुढे आले असून त्यांना पंतप्रधान व्हायची घाई झाल्याचे त्यांनी मोदींचे नाव न घेता सांगितले, पण त्यांनी (मोदींनी) कितीही जनसंपर्क कंपन्या आणल्या किंवा अमेरिकेतून तज्ज्ञ आणून प्रतिमा बनवण्याचे काम केले तरी काँग्रेसच्या सर्वधर्मसमभावापुढे ते टिकणार नाहीत, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात काँग्रेसने गेल्यावेळी गमावलेल्या नऊ लोकसभा मतदारसंघांपासून दौरे सुरू करणार असल्याचे सांगत मित्रपक्षालाही निवडून आणण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

चुकीचे प्रकार अधिकाराने थांबवा : माणिकराव
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले की, आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या जागा कायम वाढल्याच आहेत. आपल्या मित्रपक्षापेक्षाही आपण पुढे आहोत. गेल्यावेळी गमावलेले मतदारसंघ ऑगस्टपासून आपण पिंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस सत्ताधारी पक्ष असल्याने काही वेळा अधिकाराचा वापर करून चुकीचे प्रकार थांबवले पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसच्या नगरसेविकेच्या निलंबनाचा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे सत्ता आपल्याकडे असूनही आपण हतबल आहोत, असे भासेल. त्यामुळे काँग्रेस नगरसेविकेवर कारवाई करणार्‍यांवर कारवाई करा, असे त्यांनी सांगितले.

मदत 51 कोटींची !
मुंबई अध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांनी उत्तराखंडच्या आपत्तीग्रस्तांसाठी 51 लाखांची मदत केल्याचे सांगितले. मात्र 51 लाखांऐवजी त्यांनी 51 कोटी असा उल्लेख केला व नंतर चूक सुधारली. गुरुदास कामत, संजय निरुपम यांनी मात्र मुंबईतून 51 कोटी सहज जमू शकतात, असे सांगितले. मंत्री नसीन खान यांनी तातडीने एक कोटीची मदत जाहीर केली. तसेच माणिकराव ठाकरे यांनी पाच कोटी देणार असल्याचे जाहीर करून 51 लाखांचा चेक दिला.

आमचा भिडू मात्र चांगला : अशोक चव्हाण
मोहन प्रकाश यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारी पद पुन्हा दिल्याबद्दल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला. गेली साडेचार वर्षे महाराष्ट्रभर फिरून त्यांनी प्रत्येक जिल्ह्यांची, गावांची माहिती मिळवली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली चांगले निर्णय होतील, अशी अपेक्षाही चव्हाण यांनी व्यक्त केली. तसेच लोकसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये भाजपकडून ‘काँग्रेसमुक्त भारत’ असा प्रचार केला जात असून त्यांना तसे बोलण्याचा अधिकार नाही. कोणाला सत्तेत आणायचे हे जनताच ठरवेल, असे त्यांनी या वेळी सांगितले. युतीमध्ये मनसेला आणण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी खिल्ली उडवली. आमचा भिडू मात्र चांगला आहे, अशी पावती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिली.

स्वबळाची भाषा करताना सावधपणाही
काँग्रेसचे मतदारसंघ नसलेल्या ठिकाणीही माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी दौरे करावेत, कारण उद्या काय परिस्थिती निर्माण होईल ते सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य मुकुल वासनिक यांनी केले. तसेच गुरुदास कामत यांनी आपले आघाडी सरकार आहे. मात्र, ते चालवताना अडचणी येतात. त्यामुळे आपले आमदार स्वबळावर निवडून येतील का, याचाही विचार व्हायला हवा, असे सांगितले. मात्र, याचा अर्थ लगेच आघाडीत राहणार नाही, असा संदेश जायला नको, असा खुलासाही त्यांनी केला. राष्ट्रवादीलाही त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण मदत करायला हवी, असेही ते म्हणाले.