आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Mla Prashant Thakur May Joins Today In Bjp

पनवेलचे काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर शहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पनवेलमधील काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर हे आज भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव असलेले प्रशांत काँग्रेसने खारघर टोलनाक्याचा प्रश्न न सोडविल्याने काँग्रेस व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाराज होते. चारच दिवसापूर्वी प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पाठविला होता.
पनवेल-सायन महामार्गावर खारघर येथे उभारलेला टोलनाका रद्द करा किंवा स्थानिक वाहनांना सवलत द्यावी अशी मागणी स्थानिक आमदार म्हणून प्रशांत ठाकूर यांनी केली होती. मात्र, त्याकडे आघाडी सरकारने दुर्लक्ष केले. दोन महिन्यापूर्वी ठाकूर यांनी रास्ता रोको करीत आंदोलन केले होते. वाशी येथे जवळच टोलनाका असताना खारघर येथे आणखी एक टोलनाका नको, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. झालेला खर्च खारघर येथे टोलनाका उभारून वसूल करण्याचे धोरण सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतले आहे.
आघाडी सरकार हा प्रश्न सोडवू शकत नसल्याचे कारण देत आमदारकीचा राजीनामा दिला व काँग्रेसकडून पुन्हा कधीही निवडणूक लढविणार नसल्याचे ठाकूर यांनी म्हटले होते. त्यानुसार आज प्रशांत ठाकूर व त्यांचे वडील रामशेठ ठाकूर यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. शहांच्या उपस्थितीत आज ते भाजपमध्ये प्रवेश करतील.