आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, काँग्रेसच्या निलंबित आमदारांची सरकारवर टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधिमंडळ सभागृहात अभिभाषणासाठी येणा-या राज्यपालांना धक्काबुक्की केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या आमदारांनी मात्र भाजप सरकारनेच नियमबाह्य रीतीने विश्वास ठराव मंजूर करून घेतल्याची टीका करत आपल्यावरील कारवाईला विराेध केला आहे.
अब्दुल सत्तार
आमचे निलंबन हे अन्यायकारक आहे. विरोधी पक्षाने विरोध करू नये आणि पुढची अधिवेशने विरोधकांचा आवाज दाबून शांततेने पार पाडावी यासाठी हे निलंबन आहे. मात्र, चौकशी समितीसमोर आम्ही आपले मत मांडणार आहोत. आणि तरीही न्याय न मिळाल्यास सभागृहाबाहेर जनतेच्या सभागृहात आंदोलन उभारणार आहाेत.
राहुल बोंद्रे
आमच्यावर जाणीवपूर्वक ही कारवाई केली आहे. चुकीच्या मार्गाने सत्तेवर आलेल्या मुद्द्याची चर्चा होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक लोकांचे लक्ष वळवण्यासाठी केलेले हे निलंबन आहे.
यासाठी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष जबाबदार आहेत.
जयकुमार गोरे
जेव्हा ही घटना घडली तेव्हा मीडियाचे शेकडो कॅमेरे होते. त्यांनी केलेल्या चित्रीकरणाच्या आधारे आमचे निर्दोषत्व सिद्ध होईलच. समितीसमोर आपले मत मांडू. अल्पमतातले सरकार आहे. त्यामुळे विरोधी बाकांवरचे जेवढे आमदार कमी होतील तेवढे सरकारलाच हवे आहेत.
वीरेंद्र जगताप
राज्यपाल महाेदय येत असताना आम्ही फक्त त्यांच्याकडे आमचे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष घटनेचे अनेक जण साक्षीदार आहेत. राज्यपालांचा अवमान करण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता आणि तसे आम्ही वागलोही नाही. आम्ही फक्त गा-हाणे मांडायला गेलो होतो. आम्ही सरकारकडून नाही, पण चौकशी समितीकडून तरी न्यायाची अपेक्षा करतो.