आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई काँग्रेसमध्ये राडा, राहुल गांधींच्या दौ-याआधीच लाथाळ्यांचे ‘काँग्रेस दर्शन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नसीम खानव अस्लम शेख यांच्यात झालेल्या राडेबाजी दरम्यानचा क्षण - Divya Marathi
नसीम खानव अस्लम शेख यांच्यात झालेल्या राडेबाजी दरम्यानचा क्षण
मुंबई- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या शुक्रवार व शनिवारी (15, 16 जानेवारी) मुंबई दौ-यावर येत आहेत. राहुल गांधी यांच्या दौ-यापूर्वी आढावा घेण्यासाठी शहर पक्षाच्या वतीने आझाद मैदान येथील काँग्रेसच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान मुंबई काँग्रेसमध्येच प्रचंड राडा झाला.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याशी वाद घातला म्हणून निरुपम समर्थक आमदार अस्लम शेख आणि माजी मंत्री नसीम खान यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत खुर्च्याचीही फेकाफेकी करण्यात आली. या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नेत्यांनाही यावेळी धक्काबुक्की झाली. अर्धा तास चाललेल्या या अनोख्या लाथाळ्यांमुळे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या संस्कृतीचे ‘काँग्रेस दर्शन’झाले.
राहुल गांधी शुक्रवार-शनिवारी दोन दिवस मुंबई दौ-यावर येणार आहेत. या दौ-यात मुंबईतील नागरिकांना वीज बिलात कपात करून दिलासा द्यावा यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. आपल्याला माहित असेल की, निरूपम यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईतील वीज बिल दर कमी करावेत यासाठी आंदोलन, उपोषण केले होते. निरूपम यांनी राहुल गांधींसमोर पुन्हा याच मुद्यांवर मोर्चा काढण्याचे ठरवले आहे.
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी 5 मतदारसंघात राहुल गांधींच्या बैठका व कार्यक्रम घेण्याचे निरूपम यांनी ठरवले. मात्र, ईशान्य मुंबई मतदारसंघात राहुल यांचा कार्यक्रम का नाही याची विचारपूर बैठकीत सुरु झाली. तसेच संजय निरूपम यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांची बैठक कशाला असा सवाल माजी मंत्री नसीम खान यांनी विचारला.
दौ-याचा पहिला दिवस राहुल गांधी उत्तर मुंबईतच राहतील अशी कार्यक्रम निरूपम यांनी तयार केला. तसेच राहुल गांधी यांचा मार्गही निरूपम यांनी सोयीनुसार आखला. त्याला नसीम खान यांनी जोरदार विरोध केला. राहुल गांधी यांना उपनगरातही आणण्याचा आग्रह धरत रुट बदलण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे निरुपम आणि खान यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. खान यांचे भाषण सुरू असतानाच अस्लम शेख यांनी काही लोक नगरसेवक म्हणून निवडून येण्याच्या लायकीचे नसतानाही आम्हाला उपदेश देत असल्याचा टोला लगावला.
त्यावर उपर्‍यांनी आम्हाला शिकवू नये अशी खोचक टीका नसीम खान यांनी करताच अस्लम शेख यांचे पित्त खवळले आणि दोघांमधील शाब्दिक चकमकी वाढून त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. दोघेही एकमेकांशी भिडल्याने हॉलमध्ये एकच तणाव निर्माण झाला. अर्धा तास राडा झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी हा वाद मिटवला. वाद सोडवायला गेलेल्या आमदार भाई जगताप यांनाही यावेळी दोन्ही समर्थकांनी धक्काबुक्की केली. कार्यकर्त्यांनी आपल्या संस्कृतीप्रमाणे 'काँग्रेस दर्शन' घडविल्याची चर्चा रंगली.
बातम्या आणखी आहेत...