मुंबई - काँग्रेसच्या बुधवारी होणा-या आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेता म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध होण्याची चिन्हे असून, पदासाठी पतंगराव कदम, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत आहेत. बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नेते मल्लिकार्जुन खारगे उपस्थित राहतील.
सत्तारांची चव्हाणांवर तोफ : राजवटीत चव्हाण यांनी वेळेत निर्णय न घेतल्याने काँग्रेसला निवडणुकीत अपयश आले. त्यामुळे श्रेष्ठींनी त्यांच्या नावावर फुली मारली आहे, असे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले. चव्हाणांमुळे पक्षाचे आमदार ८२ वरून ४३ वर आले. उमेदवारांना प्रचार साहित्य मिळाले नाही. पक्षनिधीही मिळालेला नाही. चव्हाणांना ३२ आमदारांचा विरोध आहे. तरीही श्रेष्ठींनी त्यांचे नाव रेटल्यास विरोध करू, असा इशारा सत्तार यांनी दिला. चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्यासच विजय वड्डेटीवार, सुनील केदार, रामप्रसाद बोर्डीकर व माझा विरोध होता. तेव्हा सर्वांनी आम्हाला वेड्यात काढले.
पण तीन वर्षांनी आम्ही म्हणत होतो तेच खरे झाले, असे सत्तार म्हणाले.