आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आमदार फुटणार; तिघे भाजपच्या संपर्कात, राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘काँग्रेसमुक्त भारत’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यातही काँग्रेस खिळखिळी करण्याचे प्रयत्न प्रदेश भाजपच्या नेत्यांनी सुरू केले आहेत. त्याचीच पहिली पायरी म्हणून काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या गळाला लागण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे तीन आमदार सोमवारपर्यंत राजीनामे देणार आहेत. त्यामुळे आपसूकच या पक्षाचे विधानसभेचे संख्याबळ कमी होऊन विरोधी पक्षनेतेपदाची माळ आयतेच राष्ट्रवादीच्या गळ्यात पडणार आहे.

काँग्रेसची राज्यातील ताकद कमी करण्याची योजना भाजपने तयार केली असून काँग्रेसचे आमदार फोडून त्यांना भाजपत समाविष्ट करून घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विदर्भातील दोन आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. जे आमदार अत्यंत कमी फरकाने भाजपच्या उमेदवारांना हरवून निवडून आले त्यांचीच भाजपने पक्षात घेण्यासाठी निवड केल्याचे सांगितले जाते. कारण पुन्हा पोटनिवडणूक घेऊन त्यांना निवडून आणण्यास फार मेहनत घ्यावी लागणार नाही, असे भाजपचे डावपेच आहेत.

पायावर धोंडा कोण पाडून घेणार? : विखे
काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले, ‘भाजपकडे बहुमत आहे. त्यांना आणखी आमदारांची आवश्यकताच नाही. पक्षातही आमच्या कानावर तसे काही आलेले नाही. काँग्रेस सोडून कोणी स्वतःच्या पायावर दगड मारून घेईल असे मला वाटत नाही. काँग्रेसचा एकही आमदार राजीनामा देणार नाही,’ असा दावा विखेंनी केला. ‘राष्ट्रवादी सत्तेची भुकेली आहे. त्यांना दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद, सभापतिपद हवे आहे. उद्या ते मुख्यमंत्रिपद हवे, असेही म्हणतील,’ अशी टीका काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने केली.

अपक्षांच्या मदतीने अजित पवारांचा दावा
विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ ४२, तर राष्ट्रवादीचे ४१ आहे. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत या पदावर दावा केला आहे. ‘केंद्रात काँग्रेसने अन्य पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिल्याचे दर्शवत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे, मग राज्यात आम्ही अपक्षांच्या मदतीने दावा केला तर काय बिघडते?’ असा प्रश्नही राष्ट्रवादीकडून उपस्थित केला जात आहे. आता काँग्रेसचे संख्याबळ कमी करून राष्ट्रवादीला हे पद मिळवून देण्यासाठी भाजपकडून मदत केली जात असल्याचे दिसत आहे. ते यशस्वी झाल्यास राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवारांकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकते.

राष्ट्रवादीच्या नाड्या भाजपच्या हातात
‘काँग्रेसचे तीन नव्हे, तर चार आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असे भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. ‘कर्नाटकप्रमाणे हे ऑपरेशन लोटस आहे का?’ असे विचारता या मंत्र्याने सांगितले, ‘ऑपरेशन लोटसची आम्हाला आवश्यकता वाटत नाही, परंतु काँग्रेसची ताकद कमी करणे ही आमची योजना आहे. राज्यात आम्हाला सशक्त विरोधक नकोय. काँग्रेस पुन्हा पुनरुजीवित होऊ शकते. त्यामुळे त्यांचे बळ कमी करणे हे आमचे ध्येय आहे. राष्ट्रवादीच्या नाड्या आमच्या हातात असल्याने ते आमच्या पुढे जाणार नाहीत,’ असा दावाही या मंत्र्याने केला.

शरद पवारांच्या उपकाराची फेड
भाजप आणि राष्ट्रवादी दोघांनाही काँग्रेस नकोशी झाली आहे. त्यामुळेच निवडणुकांचे निकाल लागताच राष्ट्रवादीने भाजपला न मागता पाठिंबा दिला होता. आता त्याची परतफेड म्हणून भाजपने राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपद व विधान परिषदेचे सभापतिपद देण्यासाठी मदतीचे डावपेच टाकणे सुरू केले आहे. शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत.