मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवड्यात आघाडी झाली. काँग्रेस अध्यक्ष
सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यात दिल्लीत 45 मिनिटे झालेल्या चर्चेनंतर 6 ऑगस्ट रोजीच आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. परंतु राज्यातील काँग्रेस नेते मात्र अजूनही संभ्रमात असल्याचेच रविवारी दिसून आले.
खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीच आघाडीचे ठरले नसल्याचे सांगत वेळ आल्यास सर्व जागा लढवण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर काँग्रेसने राज्यातील
आपल्या वाट्याच्या 174 जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती घेणे सुरू केले आहे. वास्तविक राष्ट्रवादीची 144 जागांची मागणी असून, अद्याप जागावाटपाचे ठरायचे आहे. महिलांना प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी महिला कार्यकर्त्यांनी मुलाखतस्थळी घोषणाबाजी केली.
आघाडीबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचे सांगून माणिकराव म्हणाले की, 2009 मध्ये आम्ही लढवलेल्या जागांवरील इच्छुकांच्या मुलाखती घेणे सुरू केले आहे. निवडून येण्याची क्षमता, मतदारसंघातील जनसंपर्क या बाबी उमेदवारी देताना पाहिल्या जात आहेत. तरुण आणि महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. लोकसभेच्या वेळी 16 नवे चेहरे दिल्याची आठवणही माणिकरावांनी करून दिली. टिळक भवनात काँग्रेसच्या राज्य निवड मंडळामार्फत मुलाखती घेण्यात येत आहेत. मंडळाचे अध्यक्ष माणिकराव, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, मुकूल वासनिक, शिवाजीराव निलंगेकर, खासदार अशोक चव्हाण, शिवाजीराव देशमुख, विलास मुत्तेमवार, जनार्दन चांदूरकर, नितीन राऊत, राजीव सातव, कमल व्यवहारे आदींचा समावेश आहे.
* काँग्रेसच्या 174 जागांसाठी मुलाखती सुरू
* मराठवाडा 19 रोजी
रविवारी विदर्भाच्या 11 जिल्ह्यांपैकी 49 मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मराठवाडा, प. महाराष्ट्र 19 रोजी आहेत. 20 रोजी उत्तर महाराष्ट्र, कोकण, ठाणे व मुंबईतील मुलाखती होतील.
* एकेका जागेवर 30 इच्छुक
एकेका मतदारसंघासाठी किमान 18 ते 30 इच्छुकांनी मुलाखतीसाठी अर्ज केले आहेत, असे एका नेत्याने सांगितले. विदर्भातून माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, वीरेंद्र जगताप, रावसाहेब शेखावत, यशोमती ठाकूर या विद्यमान आमदारांसह मधुकर किंमतकर यांचे पुत्र प्रसाद यांच्यासारख्या नवख्यांनीही मुलाखतीला हजेरी लावली.
* चुका टाळणार
लोकसभेच्या वेळच्या चुका टाळून विधानसभेला सामोरे जाणार आहोत. इच्छुक जास्त असले तरी नि:पक्षपातीपणे निवड केली जाईल.
अशोक चव्हाण, समन्वय समितीप्रमुख
* सोनियांकडे तक्रार करू
प्रत्येक जिल्ह्यात किमान एक महिला उमेदवार द्यावी. तसे न झाल्यास आम्ही थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करू.
कमल व्यवहारे, महिला प्रदेशाध्यक्ष
* नीलेश राणेंबाबत मोघम भूमिका
नारायण राणेंचे पुत्र नीलेश यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधवांविरुद्ध लढण्याची घोषणा केली. यावर पक्षाच्या भूमिकेविरुद्ध कोणी जाऊ नये हे पाहू, असे माणिकराव म्हणाले.