आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Nationalist Congress Alliance Split, Divya Marathi

आघाडी : राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षांनी सोडला काँग्रेसचा हात, सरकारचा पाठिंबा काढला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेली काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही गुरुवारी फुटली. राष्ट्रवादी काँग्रेसने २८८ पैकी निम्म्या म्हणजेच १४४ जागा आणि अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. काँग्रेसने तो फेटाळून लावला. काँग्रेसने जागावाटपावर तोडग्याची वाट न पाहता ११८ उमेदवारांची यादीही जाहीर केली. त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारमधून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

निर्णय जाहीर करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची घोषणा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपालांना दिले.

एवढी दीर्घकाळ आघाडी असूनही वेळेवर निर्णय घेण्यात आला नाही. दीड महिन्यांपूर्वी शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. ते सातत्याने संपर्कात होते. चार दिवसांपूर्वी औपचारिक बैठकही झाली. परंतु योग्य वेळी निर्णय घेण्यात आला नाही, असे पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तिकडे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या आरोपाला उत्तर दिले. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या जागा लढवल्या होत्या, त्या जागी आम्ही उमेदवार दिले नाहीत. त्यांच्या अटी पाहता ते स्वबळावर लढू इच्छितात हेच स्पष्ट होते, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही १२४ पर्यंत जागा देण्यास तयार होतो. आघाडी झाली नाही तर आम्ही २८८ जागा लढवणार, असे काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटले आहे.

कशामुळे फुटली आघाडी?
जागा वाटपावरून मतभेद : १९९९ च्या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. २००४ मध्ये राष्ट्रवादीने १२४ व २००९ मध्ये ११४ जागा लढवल्या होत्या. याही वेळी काँग्रेस राष्ट्रवादीला ११४ पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नव्हती. राष्ट्रवादीला मात्र १४४ जागा हव्या होत्या. काँग्रेसने तडजोडीपूर्वीच ११८ जागांचे उमेदवार जाहीर केली.

सीएमपदाची खुर्ची
२००४ मध्ये जास्त आमदार असूनही राष्ट्रवादीने काँग्रेसला सीएमपद दिले. मात्र २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधारे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या जागा घटवल्या. या वेळी राष्ट्रवादीने अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मागितले होते. काँग्रेस त्याला राजी झाली नाही.
पुढे पाहा गेल्या 15 वर्षातील आघाडीची निवडणुकीतील कामगिरी...